Join us

'अशा लोकांमध्ये काम करणं म्हणजे...' पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:47 PM

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ व्यासपीठावर येत काय म्हणाले?

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना काल राज्य शासनाचा  'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) पुरस्कार  प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.वरळी येथील डोम, एनएससीआय (नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे ५७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मानाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला.

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी व्यासपीठावर येत भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "महाराष्ट्राचा प्रेक्षक हा अतिशय बुद्धिमान प्रेक्षक आणि त्यातसुद्धा अतिशय खडूस प्रेक्षक आहे. काम आवडलं तर आवडलं नाही तर नाही. आवडलं तर डोक्यावर घेतील नाहीतर विचारणार सुद्धा नाही, बघणार पण नाही. अशा लोकांमध्ये काम करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.आपण त्यांच्यापुढे काहीही सादर करु शकत नाही. आपण जे करतो ते तुम्हाला आवडेल याचं आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं. आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा, दिग्दर्शकाला काय आवडतं वेगळं पण तुम्हाला आवडतंय की नाही हे महत्वाचं हाच दृष्टिकोन मी कायम ठेवला. श्रेष्ठ शेवटी तुम्हीच. तुम्ही नाही आलात तर आम्ही घरीच."

"स्वतः इतके मोठे कलाकार असताना सगळं महत्त्व प्रेक्षकांना द्यावं किती तो मनाचा मोठपणा आहे अशोक मामांचा महाराष्ट्राचं अहोभाग्य की ते मराठी आहेत" अशा शब्दात चाहत्यांनी त्यांना दाद दिली. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला तेव्हाच प्रेक्षकांना, चाहत्यांना अत्यानंद झाला होता. काल प्रत्यक्षात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तो क्षण खरोखरंच भावूक करणारा होता. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित होत्या.

टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेतामहाराष्ट्रमराठी चित्रपट