उत्तम अभिनयशैली, संवादफेक कौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अशोक सराफ ( ashok saraf). गेल्या कित्येक वर्षांपासून अशोक सराफ त्यांच्या कसदार अभिनयामुळे प्रेक्षकांसोबत जोडून आहेत. त्यामुळे आजवर त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. यात त्यांचे 'धुमधडाका', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'एक डाव भुताचा' असे कितीतरी चित्रपट गाजले. मात्र, त्यांचा धुमधडाका हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहातात. या चित्रपटातील प्रत्येक सीनसह त्यातील कलाकारांचे संवादही लोकप्रिय झाले. त्यातलेच काही शब्द म्हणजे 'व्याख्या,विख्खी, वुख्खू' अशोक सराफ यांचे हे तीन शब्द तुफान लोकप्रिय झाले. मात्र, हे शब्द नेमके आले कुठून हे त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं.
'धुमधडाका' हा चित्रपट विविध कारणांसाठी चर्चेत आला. यात खासकरुन कलाकारांचे डायलॉग्स प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले. त्यातलाच अशोक सराफ यांचा 'व्याख्या,विख्खी, वुख्खू हे शब्द तर सोशल मीडियावर तुफान गाजले. आजही अनेकदा नेटकरी एखाद्या गोष्टीचं उत्तर टाळायचं असेल तर या शब्दांचा वापर करतात. मात्र, हे शब्द नेमके आले कुठून हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. याचं उत्तर अशोक मामांनी स्वत: दिलं आहे.
"धुमधडाका या चित्रपटात एका सीनमध्ये मी महेशच्या वडिलांची भूमिका साकारली होती. यावेळी महेशचे वडील होऊन मला धनाजी वाकडे यांच्या घरी जायचं होतं. त्यावेळी धनाजी वाकडे यांच्या बंगल्याबाहेर गाडी थांबवल्यावर मी मोठ्या ऐटीत पाइप स्मोकिंग करत होतो आणि माळी, मालक कुठे आहेत असं विचारतो. त्यावर मीच मालक आहे, असं उत्तर धनाजी वाकडे देतात. त्यांच्या या उत्तरावर काय बोलावं हे सुचत नव्हतं त्यामुळे मी मुद्दाम खोकल्यासारखा आवाज काढला. पण चुकून आलेले हे तीन शब्द इतके गाजतील असं कधीही वाटलं नव्हतं", असं अशोक मामा म्हणाले.
दरम्यान, 'धुमधडाका' हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच उत्साहात पाहतात. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासह महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ,शरद तळवलकर, प्रेमा किरण ही दिग्गज कलाकारांची फौज झळकली होती.