ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे २४ जुलैला वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. जयंत सावरकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा, सून असा परिवार आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते.
जयंत सावरकर यांचे पार्थिव ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होते. उदय सबनीस, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, विनय येडेकर, प्रसाद कांबळी, सुशांत शेलार, अतुल परचुरे यांनी अण्णांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, अण्णांबरोबर काम करण्याचा योग बऱ्याच वेळा योग आला, रंगभूमीशी एकनिष्ठ असावं म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णा. दीपस्तंभ नावाची मालिका आम्ही केली होती तेव्हा त्यामध्ये आम्ही एका एपिसोडला १८ मिनिटांचा एक सीन वन शॉट वन सीन केला होता. त्यावेळी अण्णा म्हणाले होते की मी उभा राहतो तो केवळ रंगभूमीमुळे. रंगभूमीशी एकनिष्ठ राहिलो की रंगदेवतेचे आशीर्वाद पाठीशी असतात असे ते कायम म्हणायचे. अण्णांचा फोन आला की ते पहिले वाक्य मराठी रंगभूमीचा विनम्र सेवक जयंत सावरकर बोलतोय असे असायचे. अण्णांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असे मला वाटते.
जयंत सावरकर आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून घराघरात पोहचले. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे, १९३६ रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षी, म्हणजे १९५५पासून चेहऱ्याला रंग लावून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.'एकच प्याला, 'अवध्य', 'तुज आहे तुजपाशी', 'दिवा जळू दे सारी रात', 'वरचा मजला रिकामा', 'सूर्यास्त', 'व्यक्ती आणि वल्ली', 'हिमालयाची सावली' या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच 'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरील मालिकेत ते दिसले होते. 'समांतर' या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.