Pradeep Patwardhan :'मोरूची मावशी' फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन अनंतात विलिन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:59 PM2022-08-09T19:59:14+5:302022-08-09T20:16:32+5:30
Pradeep Patwardhan : आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे अश्रू अनावर झाले होते.
आपल्या अभिनयानं नाट्य आणि सीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज सकाळी निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांचं ह्रदयविकाराचा झटक्याने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले विजय पाटकर, चंद्रकांत वाडकर हेही भावूक झाले होते.
नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘एक दोन तीन चार’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’ अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. केवळ चित्रपट नव्हे तर नाटक, मालिकाही त्यांनी गाजवल्या. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
महाविद्यालयापासून त्यांनी एकांकिकांमधून अभिनयास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक रंगभूमीकडे वळवला. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांची भूमिका अतिशय गाजली. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.