Join us  

विजय कदम यांचा मुलगा आहे प्रसिद्ध रॅपर, वडिलांना लेकाचा कायम अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 1:08 PM

आज सकाळी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दुःखद निधन झालं. त्यांंचा मुलगा काय करतो, याविषयी जाणून घ्या

आज मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे  विजय कदम यांच्या निधनाची. वयाच्या ६७ व्या वर्षी विजय कदम यांचं निधन झाल्याने. गेल्या काही दिवसांपासून विजय कदम कॅन्सरने ग्रस्त होते. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांचा मुलगाही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. जाणून घ्या विजय कदम यांच्या मुलाविषयी

विजय कदम यांचा मुलगा प्रसिद्ध रॅपर

विजय कदम यांच्या मुलाचं नाव गंधार कदम. गंधार हा प्रसिद्ध रॅपर असून तो स्वतःची रॅप गाणी बनवतोच. शिवाय त्या गाण्यांना संगीतबद्धही करतो. Its Majja ला दिलेल्या मुलाखतीत विजय कदम यांनी मुलाविषयी खुलासा केला होता. विजय म्हणाले होते, "जेव्हा मी मुलाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बघितला तेव्हा मला कळलं की हा प्रकारच वेगळा आहे. तो नुसताच रॅप करत नाहीय तर संगीत दिग्दर्शनही करतो. याशिवाय तो रॅपच्या ओळीही लिहितो. जसं सबकुछ विजय कदम तसं सबकुछ गंधार कदम."

विजय यांना लेकाचं कायम कौतुक

विजय लेकाविषयी सांगताना पुढे म्हणाले होते की, "नुकताच गंधारचा जो कार्यक्रम झाला त्यात त्याने सलग ४० मिनिटं लोकांना त्याचे रॅप ऐकवले. लोकांसमोर बोलताना हे एवढं हा विसरत कसा नाही. इतकं सणसणीत खणखणीत बोलतो. नुसतंच मराठी नाही तर इंग्रजी आणि हिंदीही ओळी या रॅपमध्ये असतात. मी फार फार तर दोन भाषांमध्ये केलं असेल. म्हणजे जे बापाला जमलं नाही ते त्याने केलं. मला कौतुुक आहे त्याचं." अशाप्रकारे विजय कदम यांचा लेक गंधार रॅपर आहे. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वातील एक चतुरस्त्र अभिनेता गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

टॅग्स :विजय कदममराठीमराठी अभिनेता