काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत मग तो अभिनयातील असो वा दानधर्माचा. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे विक्रम गोखले यांचे वडील. जे दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून देत असत. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले यांनी त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे चालू ठेवला असून दरवर्षी त्यांनीही हे मदतकार्य चालूच ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रम गोखले यांनी स्वतः मदत तर केली आहेच परंतु बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
ज्येष्ठ कलावंतांची नेहमी होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवला आहे.
आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही २.५ कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करण्साठी सदर जागा विक्रम गोखले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे.