मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या बऱ्याच मोठ्या कालावधीपासून अल्झायमरने ग्रस्त होत्या.
सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी ८० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. २०१३ साली त्यांनी त्यांच्या लग्नाची पन्नाशी साजरी केली होती. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्यं आहेत.
१९५७ साली सिनेइंडस्ट्रीत केले पदार्पण
१९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.२०१७ साली पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.