मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरने ग्रासलं होतं. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सीमा देव यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. २०१३ साली त्यांनी मोठ्या उत्साहात लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. त्या दोघांचंही एकमेकांवर अतोनात प्रेम होतं. रमेश देव यांचं फेब्रुवारी २०२२मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सीमा देव आणि रमेश देव यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘जगाच्या पाठीवर’ सिनेमात ते पहिल्यांदा एकत्र दिसले होते. वरदक्षिणा या चित्रपटादरम्यान त्यांच्यातील प्रेमसंबंध खुलले. त्यानंतर लग्नागाठ बांधत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही मुले आहेत.
रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेकदा त्यांची एव्हरग्रीन लव्हस्टोरी सांगितली होती. टीव्ही ९ला दिलेल्या एका मुलाखतीत रमेश देव यांनी सीमा देव यांच्या मांडीवर श्वास सोडण्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. “लग्नाची ५३ वर्ष आणि त्याआधी चार-पाच वर्ष...या काळात तू नेहमी मला साथ दिलीस. माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर सोडावा, ही माझी एकच इच्छा आहे. माझी ही शेवटची इच्छा पूर्ण कर,” असं रमेश देव म्हणताच सीमा देव भावुक झाल्या होत्या.
सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटादतून त्यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.