आई, वहिनी, भावजय, नणंद, बहीण, जाऊ.. ही नाती आणि त्यांतील जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य अशा भावना कशा जपाव्यात, याचा वस्तुपाठच जणू पडद्यावरून चार-पाच दशके ज्यांनी दिला, त्या घराघरांतील प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेल्या दीदी. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं आज निधन झालंय. त्या ९४ वर्षांच्या होत्या. सुलोचना दीदी गेल्याने मराठी रसिकांच्या मनाला धक्का बसला आहे. त्यांनी मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्ये सुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सिनेसृष्टीत ७५ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने दीदींनी लोकमतला खास मुलाखत दिली होती.
दीदी तुम्हाला कधी वाटले होते का, की तुम्ही सिनेसृष्टीत ७५ वर्ष पूर्ण कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, मी शाळेत कधीच वेळेवर जायचे नाही. खेड्यातील आयुष्यबाबत तुम्हाला तर माहिती आहे. तंबूतले सिनेमा यायचे मी ते मावशीसोबत बघायला जायचे. मी पडद्याच्याजवळ अंथरुण घालून बसायचे, मला वाटायचे जितक्या जवळ बसू तितके चांगले दिसले. मध्ये-मध्ये जाऊन पडद्याच्या मागेही बघायचे कोण बोलता येत, कोण काय करता येत मला वाटायचे तिथं माणसं आहेत, पण मागे तर कुणीचं नसायचं. पण त्यावेळी माझ्या डोक्यात सिनेमात जायचं असं काही नव्हतं. बेनाडीकर वकील होते, ते एकदा माझ्या वडिलांना भेटले. माझे वडील त्यांना म्हणाले, आता या मुलीचे काय करायचे, ही शाळेत ही जात नाही आणि घरातली कामही करत नाही. त्यावर वकील म्हणाले, आपण हिला सिनेमात पाठवू.
पुढे त्या म्हणाल्या, बेनाडीकर वकील हे मास्तर विनायकांचे शाळेपासूनचे मास्तर होते. विनायकरावा नेहमी त्यांच्याकडे यायचे भेटायला. एक दिवस मला त्यांनी विनायकरावांच्या पुढे नेऊन उभी केली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि बेनाडीकरांना म्हणाले हिला एक तुमचं पत्र देऊन कोल्हापूरला पाठवून द्या. अशा पद्धतीने मी कोल्हापूरला आले. त्यांच्या कंपनीत गेले. मग मी भालजी पेंढारकरकडे कामाला लागेल. ती तिथे नोकरीला राहिले मला ३० रुपये पगार होता. माझी खऱ्या अर्थाने सुरुवात तिथेच झाली.