मराठी कलाविश्वातील एक काळ गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उषा नाईक (Usha Naik). पिंजरा, भुजंग, हळदी कुंकू, एक होता विदूषक असे कितीतरी सिनेमा त्यांनी हिंट केलं. सध्या उषा नाईक अनेक मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्या कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतात. यामध्येच काही दिवसांपूर्वी ५७ वा ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट’ पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी उषा नाईक यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हापासून त्या सातत्याने चर्चेत येत आहे. यात त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये थक्क करणारं विधान केलं आहे.
अलिकेडच उषा नाईक यांनी 'अल्ट्रा मराठी बझ'च्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं. त्यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
उषा नाईक यांच्यासोबत इंडस्ट्रीत झाला दुजाभाव?; पहिल्यांदाच व्यक्त केली खंत
नेमकं काय म्हणाल्या उषा नाईक?
'तुम्ही आजवरच्या प्रवासात अनेक चित्रपट केले. विविधांगी भूमिका साकारल्या, ज्या वाखाणण्याजोगा होत्या. पण बऱ्याच चित्रपटात तुमचे कॅमिओ आहेत. पण, मोठ्या भूमिका नाहीत, असं का?' असा प्रश्न उषा नाईक यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी बेधडक वक्तव्य केलं. “त्याचं कारण मला माहिती नाही. मी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे सांगते की, माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आलं. मी नाईक आहे. मी अगदी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं. पण माझं तसं नाही झालं. मी नेहमीच सांगते. आता या वयाला आल्यानंतर स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. पण, पूर्वी बोलत नव्हते. आता बोलायला लागले आहे ते पण स्पष्टचं बोलते, असं उषा नाईक म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, “एकतर माझा कुणी गॉडफादर नाही. छोट्या कुटुंबातून आले आहे. देखावा कसा करायचा? हे माहित नाही. फार आपण कोणीतरी आहोत, मला काहीतरी मिळालेलं आहे, मी बरंच काम केलंय हे दाखवायची सवय नाही. तेव्हा नव्हती आणि आजही नाही. कदाचित ही सवय यापुढेही माझ्यात दिसणार नाही. कारण मी आध्यात्मिक आहे. माझ्या गुरुंच्या अध्यात्मात माझी मनाची जडणघडण होतेय. त्यामुळे तिथे बाह्य रंगाला काहीच किंमत नसून अंतरंगाला किंमत असल्यामुळे कदाचित त्या गोष्टीचं मला फारस मोल वाटतं नाही. मला बरीच पारितोषिक मिळाली. आता अण्णांच्या (व्ही. शांताराम जीवनगौरव) नावाने पुरस्कार मिळाला. तर मला त्याचं जास्त नवलं वाटतं नाही. माझी कारकीर्द तेवढी झाली होती म्हणून मला पुरस्कार मिळाला.”