ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (Manik Bhide) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिक भिडे यांच्या निधनानंतर शास्त्रीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
माणिकताई भिडे हे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील खूप मोठे नाव होते. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांनी आजवर अनेक मोठ्या गायक गायिकांना घडवले आहे. माणिक भिडे यांना गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सन्स या आजाराने ग्रासले होते. त्यावर उपचारदेखील सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
माणिक गोविंद भिडे यांचा जन्म १९३५ साली कोल्हापूरमध्ये झाला. बालपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले होते. माणिक भिडे यांना आजवर अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.