Join us

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं कॅन्सरने निधन, वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 10:36 IST

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं दुःखद निधन झालंय

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय. ते ६७ वर्षांचे होते. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत कार्यरत होते. कॅन्सरची झुंज अपयशी झाल्याने विजय कदम यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. अंधेरी येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या निधनाने हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.

विजय कदम यांच्या विनोदी भूमिका गाजल्या

विजय कदम हे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय होते. नाटक, सिनेमे, जाहिराती अशा माध्यमांत कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. ही जाहिरात प्रचंड गाजली. विजय कदम यांनी १९८०-९० च्या काळात रंगभूमीवर केलेल्या विनोदी  भूमिका प्रचंड गाजल्या. 'सही दे सही', 'विच्छा माझी पुरी करा', 'पप्पा सांगा कुणाचे' आणि 'टूरटूर' या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या.

विजय कदम यांची सिनेकारकीर्द

विजय कदम यांनी रंगभूमी गाजवलीच शिवाय सिनेसृष्टीमध्येही दमदार भूमिका साकारल्या. 'चष्मेबद्दूर', 'मंकी बात', 'ब्लफमास्टर', 'टोपी घाला रे', 'भेट तुझी माझी', 'देखणी बायको नाम्याची' या त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. विजय कदम युवा रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या पिढीची नाटकं पाहायला हजेरी लावायचे. याशिवाय पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावून अनेक कलाकारांचं कौतुक करायचे. विजय कदम यांनी शेवटी झी मराठीवरील 'ती परत आलीये' मालिकेत बाबूराव तांडेल ही भूमिका साकारली.

 

 

टॅग्स :विजय कदम