Join us

चित्रपटसृष्टीचं लेणं काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 5:50 AM

गेल्या काही वर्षांपासून त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपल्या सदाबहार अभिनयाने रुपेरी पडदा व्यापून टाकणाऱ्या आणि चित्रपटसृष्टीबरोबरच वास्तवातील संसारही सुखाचा केल्याने चित्रपटसृष्टीचं लेणं अशी ख्याती असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (८१) यांचे गुरुवारी वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते. पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभिनय देव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सीमा देव यांचे पती ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे गेल्याच वर्षी निधन झाले.

रमेश आणि सीमा देव यांच्या रूपेरी पडद्यावरील जोडीने वास्तवातही सुखी संसार करत इतरांसमोर आदर्श निर्माण केला. गिरगावात लहानाच्या मोठ्या झालेल्या सीमा यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ होते. शालेय जीवनापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. संगीतकारांची लाेकप्रिय जाेडी कल्याणजी- आनंदजी यांच्यातील आनंदजींच्या ऑर्केस्ट्रात त्या गाणेही गायच्या. गायन आणि नृत्याची आवड त्यांना मनोरंजन विश्वाकडे घेऊन आली.

या भूमिका गाजल्या

१९५७ मधील ‘आलिया भोगासी’ या चित्रपटाद्वारे सीमा सिनेसृष्टीत दाखल झाल्या. ‘जगाच्या पाठीवर’ व ‘सुवासिनी’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा स्मरणात राहणाऱ्या ठरल्या. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘पडछाया’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘जेता’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘कोशिश’, ‘कश्मकश’, ‘कोरा कागज’,  ‘नसीब अपना अपना’, अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘आनंद’ चित्रपटातील सीमा यांची भूमिकाही कायम स्मरणात राहणारी ठरली.

टॅग्स :अजिंक्य देवरमेश देवमराठी