सुवर्णा जैन
सध्या चित्रपटसृष्टीत तनुश्री दत्ता विरुद्ध नाना पाटेकर वाद चांगलाच पेटला आहे. अभिनेता नाना पाटेकर यांनी २००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान छेडछाड करण्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. या आरोपांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळींनी तनुश्रीची उघडपणे बाजू घेतली. मात्र तनुश्रीच्या या आरोपानंतर मराठीतील मोजकेच मंडळी पुढे आली आहेत. कुणीही उघडपणे नाना यांच्या बाजूने बोलण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता एका दिग्गज मराठी कलाकाराने अभिनेता नाना पाटेकर यांना खुलं समर्थन दिलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून नाना पाटेकर यांचे निकटवर्तीय, सहकारी आणि प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे हे आहेत.
तनुश्री-नाना वादावर पहिल्यांदाच मकरंद अनासपुरे यांनी उघडपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कुणीतरी येते आणि नाना यांच्यासारख्या कलाकारावर आरोप करते अत्यंत चुकीचे असल्याचे मकरंद यांनी म्हटले आहे. याबाबत मराठी कलाकारांनी बोलायला हवं होतं असंही ते म्हणालेत. या सगळ्या वादावर ते नाना यांना पाठिंबा देणार का या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. 'नाना यांच्या पाठिशी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी' अशा शब्दांत मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकर यांना जाहीर समर्थन दिले आहे.
आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना यांच्यावरील या आरोपांमुळे साऱ्यांनाच धक्का बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च केली आहे. त्यामुळे तनुश्रीने केलेल्या आरोपानंतर अनेकांना विशेषतः नाना यांच्या फॅन्सना यांत तथ्य वाटत नाही.
Tanushree Dutta Controversy: जितेंद्र जोशीने दिली ही प्रतिक्रिया
जितेंद्र जोशी म्हणाला की, एक गोष्ट घडते त्यावर सगळेच जण प्रतिक्रिया देत सुटतात. तर्कवितर्क लावण्यापेक्षा दोघांची बाजू समजून घेतली पाहिजे. मी नानांच्या प्रतिक्रियेची वाट बघेन. त्यांची बाजू ऐकायला हवी. आपण एक बाजू ऐकून पटकन रिअॅक्ट होतो. त्यातले काय खरे काय खोटे हे माहित नसताना त्यावर आपले मत व्यक्त करणे चुकीचे आहे. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता या दोघांचाही अपमान होता कामा नये. दुसऱ्याच्या आयुष्यावर शितोंडे उडविणे योग्य नाही. त्यामुळे नानांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणे उचित ठरेल.