'डोंबिवली रिटर्न ' हे नाव ऐकल्यावर अनेकांना हा 'डोंबिवली फास्ट ' चा सिक्वल आहे का, असं वाटतं . पण तसं नसून 'डोंबिवली रिटर्न ' ची कथा पूर्ण वेगळी आहे. ती 'अनंत वेलणकर ' या व्यक्तिरेखेची कथा आहे. ही व्यक्तिरेखा सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे. संदीपजींनी शाम बेनेगल, मधुर भांडारकर, गोविंद निहलानी, रामगोपाल वर्मा ,निखिल अडवाणी यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. मराठी मालिका आणि चित्रपट यातल्या संदीपच्या भूमिकांनी नेहमीच आपल्या मनात घर केलं आहे . हा चित्रपट मराठी -हिंदी दोन्ही भाषांत निर्माण होत असल्याने या दोन्ही भाषांची उत्तम जाण असणारे कलाकार यात आहेत. वेब सीरिजच्या दुनियेतील युथ आयकॉन असणारा अमोल पराशर या चित्रपटातील श्रीभावजींच्या भूमिकेत लक्षात राहिलाय. मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या अमराठी असलेल्या राजेश्वरी सचदेव यांनी 'उज्वला वेलणकर ' ही व्यक्तिरेखा साकारताना खूप मेहनत घेतली आहे.
ऋषिकेश जोशी यांना आपण मराठी- हिंदी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका करताना पाहिलंय. फक्त पडद्यावरील कलाकारांचेच नव्हे तर पडद्यामागच्या कलाकारांचे सुद्धा या चित्रपटाच्या संदर्भातील योगदान खूप महत्वाचं आहे. अनमोल भावे आणि मंदार कमलापूरकर यांनी केलेलं 'साउंड डिझायनिंग ' हा चित्रपटाच्या कथेचाच एक भाग होऊन गेलाय. ते किती परिणामकारक ठरलंय, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल. राष्ट्रीय पुरस्कार विजेता शैलेंद्र बर्वे यांचं संगीत व पार्श्वसंगीत चित्रपटाला आहे. संदीप कुलकर्णींसारखा निर्माता अभिनेता ,महेंद्र तेरेदेसाईंसारखा लेखक -दिग्दर्शक अशी सर्व टीमची केमिस्ट्री जुळल्यावर 'डोंबिवली रिटर्न' एक वेगळा अनुभव निश्चितपणे देईलच.