गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते. गांवदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 78 वर्षांचे होते. विजू खोटे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेमुळे.
‘कालिया’ भूमिकेने विजू खोटे यांना अपार लोकप्रियता मिळाली. ही भूमिका इतकी गाजली की, आजही विजू खोटे यांनी साकारलेली कालिया भूमिका रसिकांच्या मनात जिवंत आहे. चित्रपटांत येण्याआधी विजू स्वत:चे प्रिंटींग प्रेस चालवायचे. विजू खोटे यांनी आपल्या कारकीर्दीला नायकाच्या भूमिकेपासून प्रारंभ केला. पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. ‘या मालक’ हा विजू खोटे यांचा पहिला डेब्यू सिनेमा होता. 1964 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा विजू यांचे वडील नंदू खोटे यांनी प्रोड्यूस केला होता. नंदू खोटे हे सायलेन्ट कॉमेडीसाठी ओळखले जात. या व्यातिरिक्त ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. विजू खोटे यांनी जवळ जवळ 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलीत.
त्यांच्या निधनानं एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे.