Vikram Gokhale Death: मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि टीव्हीवरील मालिका अशा अभिनयाच्या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती खालावत गेली व त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला.
शरद पवार काय म्हणाले-
"ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला. अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ५० वर्ष रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!" असे ट्विट करत शरद पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले-
"आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले.भावपूर्ण श्रद्धांजली!" अशा सहवेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले-
"मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व! भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले! अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे," असे ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.
विक्रम गोखले मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होते. विक्रम गोखले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होते. याशिवाय ते 'भूल भुलैया', 'दिल से', 'दे दना दान', 'हिचकी', 'निकम्मा', 'अग्निपथ', 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. भिंगरी, माहेरची साडी, लपंडाव, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.