Vikram Gokhale Death: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह मालिकांच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला होता. गोखले कुटुंबातील विक्रम गोखले हे चौथ्या पिढीतील अभिनय होते. ३० ऑक्टोबर १९४७ ला पुण्यात जन्मलेल्या विक्रम गोखले यांनी आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. उपचार सुरू असूनही त्यांची प्रकृती खालावतच गेली व अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. कलेच्या प्रांतातील सर्जनशील कलावंत, मार्गदर्शक हरपला, अशा शब्दांत विक्रम गोखलेंना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शब्दांजली वाहिली.
"ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान मिळविले. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच वाटत असलेली आदरयुक्त भीती हा मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. चित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगाच्या पलीकडेही एक जग आहे आणि त्या जगातील सामान्य माणसांच्या वेदनेशी, जगण्याशी आपण एकरूप व्हायला हवे, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जोपासले. या श्रेष्ठ कलावंत, विचारवंताच्या नसण्याची ही उणीव नेहमी जाणवत राहणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली," अशा शब्दांत बावनकुळे यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या.
दरम्यान, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. आज सायंकाळी ६ वाजता वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विक्रम गोखलेंची समृद्ध कारकीर्द
विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७१ हून जास्त हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांच्या पत्नीचं नाव वृषाली आहे.
विक्रम गोखले मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होते. विक्रम गोखले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होते. याशिवाय ते 'भूल भुलैया', 'दिल से', 'दे दना दान', 'हिचकी', 'निकम्मा', 'अग्निपथ', 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. भिंगरी, माहेरची साडी, लपंडाव, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.