मराठी आणि हिंदी सिनेमाचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी छोट्या पडद्यावरच्या मालिकांबद्दल प्रेक्षकांना एक मोठा सल्ला दिला आहे. होय, प्रेक्षकांनो स्वत:चा चॉईस तपासून बघा आणि भिकार मालिका पाहणं बंद करा, असं त्यांनी म्हटलं आहे. तुम्हीच बंद करा, म्हणजे, त्यांना आवडतं म्हणून आम्ही ते देतो, असं म्हणणारे जे आहेत त्यांच्यावर आपोआप बंदी येईल. त्यांच्यावर आली की चॅनलवरही येईल, अशा शब्दांत त्यांनी मालिकेच्या घसरत चाललेल्या दर्जाबद्दल मत व्यक्त केलं.
कल्याण सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याखानमालेत त्यांनी हे परखड मत मांडलं. यावेळी मालिकांच्या घसरत चाललेल्या दर्जाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
पैसे मिळवण्यासाठी काहीही प्रेक्षकांच्या माथी मारलं जात आहे. अर्थहिन, सुमार मालिका ‘घाल पाणी, घाल मीठ’ अशा पद्धतीने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत, असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांना अशा सुमार मालिका न पाहण्याची विनंती केली. मी प्रेक्षकांना विनंती करेल की, अशा भिकार मालिका पाहणं बदं करा. स्वत:चा वेळ वाया घालवू नका. तुमचा चॉईस तपासा, त्यावर बंधनं घाला. आपण काय पाहतोय, यातून काय मिळतेय? याचा जरा विचार करा. उगाच मनोरंजनाच्या नावाखाली तुमचा अमूल्य वेळ फुकट घालवू नका. निरर्थक मालिका, तेवढेच निरर्थक सीन्स पाहून तुम्हाला काय मिळतं? असा सवाल त्यांनी केला. अंतर्मुख करणारे सिनेमे, मालिका, नाटकं जरूर बघा. कारण त्यामुळे चांगले नट तयार होती. चांगले दिग्दर्शक येतील, असं ते म्हणाले.
उत्तम वाचा, उत्तम पाहा, उत्तम अनुभवा आणि ते मिळत नसेल तर बंद करा. अशाने भिकार मालिका बनवणारे आपोआप वठणीवर येतील. हातात रिमोट आहे. बटणं दाबली की हजार चॅनेल तुमच्या समोर येतील. त्यातलं हुडकून हुडकून चांगलं तेच बघा. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत भिकार मालिका बंद होणार नाहीत. त्याचं असंच चालू राहणार, असंही ते म्हणाले.
नागराज मंजुळे यांचं केलं कौतुककोरोना काळाचं वर्णन करणारी ‘वैकुंठ’ या शॉर्ट फिल्मचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली ही शॉर्ट फिल्म अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल मी नागराज मंजुळेंना आभार देईल. आपल्याला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असंही ते म्हणाले.