Join us

Vikram Gokhale : विक्रम, मैं यह तुम्हारे लिए.., केवळ विक्रम गोखलेंच्या मैत्रीखातर अमिताभ यांनी केला होता मराठी सिनेमा..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 3:09 PM

Vikram Gokhale Passes Away : मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:च्या अभिनयाची चुणूक दाखवणारे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या अनेक आठवणी,त्यांच्या अभिनयाने सजलेल्या कलाकृती कायम आपल्या मनात जिवंत असतील.

मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:च्या अभिनयाची चुणूक दाखवणारे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या अनेक आठवणी,त्यांच्या अभिनयाने सजलेल्या कलाकृती कायम आपल्या मनात जिवंत असतील. विक्रम गोखलेंचा असाच एक सिनेमा म्हणजे, ‘एबी आणि सीडी’. या सिनेमा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले. अमिताभ यांनी हा सिनेमा फक्त आणि फक्त विक्रम गोखले यांच्या मैत्रीपोटी केला होता. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांना एक रूपयाही घेतला नव्हता.

खुद्द विक्रम गोखले यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ‘अमिताभ बच्चन आणि मी आम्ही दोघं एकमेकांना गेल्या 55 वर्षांपासून ओळखतो. अमिताभ एक सच्चा माणूस आहे, एवढंच मी सांगेल. आम्ही अनेक हिंदी चित्रपटांत एकत्र काम केलं. पण एबी आणि सीडी हा अमिताभ यांचा पहिला मराठी सिनेमा आहे. हा चित्रपट त्यांनी फक्त माझ्यासाठी केला. विक्रम, मैं यह तुम्हारे लिए कर रहा हूं, असं ते मला म्हणाले होते. या चित्रपटासाठी त्यांना एक रूपयाही घेतला नाही,’असं विक्रम गोखले यांनी सांगितलं होतं.

पैसेच काय त्यांनी तर...‘एबी आणि सीडी’ या सिनेमात विक्रम गोखले मुख्य भूमिकेत होते. अमिताभ यांनी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या मराठी सिनेमाच्या निमित्ताने विक्रम गोखले अमिताभ यांच्याबद्दल भरभरून बोलले होते. अमिताभ यांनी या सिनेमासाठी एक रूपयाही घेतला नाही. अगदी चित्रपटासाठी लागणारे कपडे ते आपल्या घरून घेऊन आले होते. आम्ही तुमच्याकडे कपड्यांचं माप घेण्यासाठी कारागीर पाठवतोय, असं मेकर्सनी अमिताभ यांना कळवलं. पण अमिताभ यांनी त्यास नकार दिला. चिंता करू नका, मी माझ्या वार्डरोबमधले कपडे घेऊन येतो, असं त्यांनी नम्रपणे मेकर्सला सांगितलं. शूटींगच्या दिवशी अमिताभ आपली व्हॅनिटी व्हॅन घेऊन आलेत. व्हॅनमध्ये 20 कपडे ठेवलेले होते. चित्रपटात कोणते कपडे शोभून दिसतात, ते सांगा, असं ते मेकर्सला म्हणाले. अगदी या सिनेमाचं डबिंगही त्यांनी स्वत: केलं होतं.

टॅग्स :विक्रम गोखलेअमिताभ बच्चन