Join us

'हृदयांतर' नंतर विक्रम फडणीसचा दुसरा सिनेमा, हृतिक रोशनच्या हस्ते पार पडला मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 11:22 AM

या प्रसंगी अमिषा पटेल, झरीन खान, रोनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन- नंदा अशा बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थित राहून विक्रम फडणीस आणि 'स्माईल प्लीज' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. 

सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या  'हृदयांतर' सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस घेऊन येत आहे 'स्माईल प्लीज'. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याची सुरुवात बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनच्या हस्ते नुकतीच झाली. यावेळी मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांनी चित्रपटातील आपापल्या पात्रांची ओळख करून दिली. या प्रसंगी अमिषा पटेल, झरीन खान, रोनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन- नंदा अशा बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थित राहून विक्रम फडणीस आणि 'स्माईल प्लीज' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. 

 विक्रमचे काम मला माहित आहे, तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची जी सवय आहे, ती अफलातून आहे. कोणतीही गोष्ट त्याच्या डोक्यात स्पष्ट असल्यामुळेच तो, ती उत्तमरित्या साकारू शकतो. विक्रमच्या 'हृदयांतर' या चित्रपटात मी छोटीशी भूमिका साकारली होती. त्यामुळे तो सर्वांना कशा प्रकारे सामावून घेतो, याची मला कल्पना आहे. भावनिकता आणि व्यावहारिकता याचा सुंदर मेळ त्याच्या चित्रपटात अनुभवायला मिळतो. विक्रमचा 'स्माईल प्लीज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल, अशी प्रतिक्रिया हृतिक रोशन याने यावेळी दिली. 'स्माईल प्लीज'विषयी विक्रम फडणीस म्हणतो, हा चित्रपट माझ्यासाठी खूप विशेष आहे. मुळात या कथेत मला कुठेतरी माझ्या आईचा भास होतो आणि म्हणूनच तो माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. हा चित्रपट करण्याचे ज्यावेळी मी ठरवले त्यावेळी माझ्या निकटवर्तीयांनी मला खूप मदत केली. अजूनही करत आहेत. आज त्यानिमित्ताने मी त्यांचेही आभार मानतो. मला आशा आहे की, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनातील 'स्माईल प्लीज'ची फ्रेम नक्कीच बहरेल.  

 

'स्माईल प्लीज' या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट आयुष्याकडे पाहण्याचा आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारा असावा.  'हृदयांतर' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीनंतर पुन्हा एकदा विक्रम नवीन विषय असलेला एक भावनाप्रधान चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार असून  या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या चित्रपटातही रसिकांना काहीतरी वैविध्यपूर्ण पाहायला मिळणार हे नक्की. हॅशटॅग फिल्म स्टुडिओच्या निशा शाह आणि क्रित्यावत प्रॉडक्शनच्या सानिका गांधी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'स्माईल प्लीज' या चित्रपटाला रोहन- रोहन या जोडीचे संगीत लाभणार असून मंदार चोळकर चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध करणार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण मिलिंद जोग करणार आहेत.

टॅग्स :हृतिक रोशन