Join us

'वेड' चित्रपटाचं यश पाहून खलनायक भास्कर अण्णा उर्फ रविराज कांदेदेखील भारावला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 7:46 PM

Ved Marathi Movie: 'वेड' या चित्रपटात खलनायक भास्कर अण्णाची भूमिका अभिनेता रविराज कांदे याने साकारली आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनीत वेड (Ved Marathi Movie) चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या चित्रपटातून रितेश दिग्दर्शनात तर जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. पहिल्या तीन आठवड्यातच या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला. रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटाचं ३१ दिवसांचे कलेक्शन ७० कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान या चित्रपटात खलनायक भास्कर अण्णाची भूमिका साकारणारा अभिनेता रविराज कांदे (Raviraj Kande)देखील चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला आहे. नुकतेच त्याने एस.एस. ट्युटोरियल (सारिशा सायन्स अकॅडमी)च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

या कार्यक्रमात रविराज कांदे म्हणाला की, शिक्षणाला पहिलं प्राधान्य द्या, नाहीतर तुमची वेडमधील सत्यासारखी अवस्था होईल. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिकलो तर कला आणि इतर क्षेत्रातही प्रावीण्य मिळवू शकतात. 

पुढे त्याने म्हटले की, वेड चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. चित्रपटाला दिलेल्या प्रतिसाद आणि प्रेमासाठी मी सर्वांचे आभार मानतो. २०२२मधील ब्लॉकबस्टर चित्रपट बनवला, त्यासाठी मी वेड चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून तुमचा खूप आभारी आहे.

'वेड' ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली. चौथ्या आठवड्यात 'वेड'ची कमाई ५५.२२ कोटींवर पोहोचली होती. आता पाचव्या आठवड्यात ही कमाई जवळपास ७० कोटींवर गेली.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा