आज मदर्स डे... मदर्स डे निमित्त अनेक मराठी कलाकारांनी आईला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. आईसोबतचे सुंदर फोटो शेअर करत, तिचे आभार मानत, तिच्यावरचे प्रेम व्यक्त करत अनेकांनी सुंदर संदेश शेअर केले आहेत. यातलाच एक म्हणजे, ‘माझा होशील ना’ या मालिकेतील आदित्य अर्थात विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni). मराठी चित्रपटसृष्टीच्या ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांचा लेक.विराजस आणि त्याची आई मृणाल कुलकर्णी या दोघांनीही आज मदर्स डेच्या निमित्ताने लोकमतशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी मायलेकाच्या या जोडीने आपल्या नात्यातील अनेक आठवणी, किस्से़, गमतीजमती सांगितल्या. आईसाठी लिहिलेला निंबध, एका प्रसंगातून तिने दिलेली आयुष्यभराची शिदोरी असे सगळे सांगताना विराजस अनेकदा भावुक झाला तर सून कशी हवी, हे सांगताना मृणाल कुलकर्णींना हसू आवरता आले नाही...
आईने दिलेला तो धडा कायम लक्षात राहिला...
विराजने सांगितले, ‘मी इंग्रजी पुस्तकं खूप वाचतो. पण माझ्यात मराठी वाचनाचीही आवड निर्माण व्हावी म्हणून आईने एक नियम तयार केला होता. आई-बाबा आणि मी एक मराठी पुस्तक आलटून पालटून एकत्र बसून वाचायचो. ऐरवी आई फार वाट्याला यायची नाही. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही असाच मस्त वेळ घालवायचो. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आई जरा बिझी होती. पण तरिही ती एका दिवसासाठी मला भेटायला घरी आली. पण त्या दिवशीही तिला मला मनासारखा वेळ देता आला नाही. तिला लगेच फ्लाईट पकडायची होती. अशात आईने आम्हाला विमानतळावर सोडून देण्यास म्हटले. घरापासून तर विमानतळापर्यंतच्या त्या तासाभरात तिने पर्समधले पुस्तक काढले आणि मला वाचून दाखवले. यावेळी ती जे काही मला म्हणाली, ते आजही मला आठवते. क्वान्टिटी महत्त्वाची नाही तर क्वालिटी महत्त्वाची आहे. आपण किती वेळ देतो, यापेक्षा कसा देतो, हे महत्त्वाचे आहे. तिने दिलेला तो धडा मला आजही स्मरणात आहे. ’
निबंधाचा किस्सा... विराजसने शाळेतील एक खास किस्सा शेअर केला आहे. त्याने सांगितले, शाळेत असताना माझी आई हा निबंध लिहण्यासाठी दिला होता़ पण मी टिपीकल निंबंध न लिहिता वेगळाच निबंध लिहिला होता. माझी आई चोविस तास माझ्यासोबत नसल्याने माझे इतर मित्र सांगतात त्याप्रमाणे ती कटकट माझ्या मागे नसते. आईसोबत नसल्याने आजी माझे भरपूर लाड करते आणि आई जेव्हाकेव्हा भेटते तेव्हा ती सुद्धा लाड पुरवते़ म्हणजे, दोन्हीकडून माझा लाड होतो.
सून कशी हवी...सून कशी हवी? असा प्रश्न मृणाल यांना यावेळी केला असता, त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले. मुलीनी मला चालून दाखवावं म्हणजे ती लंगडी आहे की नाही मला कळेल,तिने मला तांदूळ निवडून दाखवावं म्हणजे तिची दृष्टी कशी आहे कळेल. तिने गाणं म्हणून दाखवावं..., असे गमतीत म्हणत त्या मनमोकळ्या हसल्या. माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत. विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे. आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू असे त्यांनी सांगितले.