Join us  

'पावनखिंड' सिनेमाची होती ऑफर, दाढी मिशीही वाढवली पण...विराजसने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 4:44 PM

अभिनेता विराजस कुलकर्णीला दिग्पाल लांजेकर यांनी एक रोल ऑफर केला होता. त्या भूमिकेसाठी विराजसने दाढी मिशीही वाढवायला सुरुवात केली होती.

Virajas Kulkarni : मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांचा (Digpal Lanjekar) ड्रीम प्रोजेक्ट 'शिवराज अष्टकातील' रिलीज झालेले प्रत्येक चित्रपट तुफान गाजले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अशा घडामोडींवर स्वतंत्रपणे भाष्य करणारे चित्रपट निर्माण करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. इतक्या मोठ्या सिनेमात काम करण्याची संधी कोण सोडेल असं तुम्हाला वाटत असेल मात्र अभिनेता विराजस कुलकर्णीने नुकताच 'पावनखिंड' सिनेमा सोडल्याचा खुलासा केला आहे.

'पावनखिंड' सिनेमा 18 फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. बाजीप्रभू देशपांडे यांनी शत्रूंचा नायनाट करण्यासाठी कशी खिंड लढवली याची थरारक कहाणी सिनेमात मांडण्यात आली आहे. अभिनेता अजय पुरकरने (Ajay Purkar) उत्तम भूमिका साकारली तर सिनेमाचेही प्रचंड कौतुक झाले. याच चित्रपटात अभिनेता विराजस कुलकर्णी यालाही दिग्पाल लांजेकर यांनी एक रोल ऑफर केला होता. त्या भूमिकेसाठी विराजसने दाढी मिशीही वाढवायला सुरुवात केली होती. मात्र अचानक असे काय झाले की विराजस हा सिनेमा करु शकला नाही याचा खुलासा त्याने नुकताच केला आहे.

काल वाढदिवसानिमित्त विराजस इन्स्टाग्रामवर लाईव्ह आला होता. तेव्हा त्याने सांगितले, ''मी सुभेदार सिनेमा का करतोय?' हा प्रश्न मला अनेकांनी विचारला. तर यामागे एक किस्सा आहे. तो किस्सा अप्रत्यक्षरित्या 'माझा होशील ना' या मालिकेशी जोडलेला आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, शेर शिवराज या शिवराज अष्टकातील चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर मला मी शाळेत असल्यापासून ओळखतात. ते मला शाळेत शिकवायलाही होते. दादाने मला नाटकात काम करायला शिकवलं आहे. मी लहानपणापासून त्याच्यासोबत काम केलं आहे. 

बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ

मी यापूर्वी त्याच्या दोन चित्रपटांचं सबटायटलिंग केलं आहे. त्यामुळे मी शिवराज अष्टकाशी पूर्वीच जोडला गेलो होतो. त्यानंतर अभिनयात पदार्पण केल्यानंतर शिवराज अष्टकातील एका सिनेमात काम करायचं असं मी ठरवलं होतं. पावनखिंड सिनेमात मी कामही करणार होतोय. यातील एका पात्रासाठी मी दाढी, मिशी, केस वाढवले होते.

पण नेमकी त्याचवेळी 'माझा होशील ना' या मालिकेसाठी माझी मुख्य भूमिकेत निवड झाली. त्यामुळे मी लगेच दिग्पाल दादाला फोन केला आणि सगळं सांगितलं. मी मालिका करतोय असंही सांगितलं. चित्रपटाच्या तारखांमध्ये गोंधळ होईल असं मी त्याला सांगितलं होतं. म्हणून मी सिनेमात काम करायला नकार दिला. त्यानेही मला मनापासून पाठिंबा दिला.टेन्शन घेऊ नको, तू मालिका कर, चांगली मालिका आहे, संधीही चांगली आहे असं तो म्हणाला.

Mrinal Kulkarni : “प्रिय विराजस आता तरी..” ; मृणाल कुलकर्णी यांनी लेकाला दिला खास सल्ला

तेव्हापासून त्याच्या चित्रपटात काम करणं राहिलंच होतं. आता इतक्या वर्षांनंतर एकत्र काम करुन खूप धमाल आली. पुन्हा घरी परत आल्यासारखं वाटलं. सुभेदार सिनेमात मी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. मी तुम्हाला आवडतो का हे मला पाहायचं आहे.''

विराजसने अभिनयाव्यतिरिक्त दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे. त्याचा 'व्हिक्टोरिया' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाचे संपूर्ण शूट लंडन मध्ये करण्यात आले. 

टॅग्स :विराजस कुलकर्णीदिग्पाल लांजेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपट