‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir ) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांचाच नातू व दिग्दर्शक केदार शिंदे करत आहेत. 28 एप्रिल 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी या चित्रपटाबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. होय, चित्रपटात छोट्या शाहीर साबळेंना आवाज देण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या एका पोराला निवडलं आहे. होय, त्याचं नाव जयेश खरे.
होय, जयेश खरे (Jayesh Khare) नावाचं एक चिमुरडं पोर. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. सहावीत शिकणाऱ्या जयेशनं शाळेत ‘चंद्रमुखी’ सिनेमातील ‘चंद्रा’ हे गाणं गायलं, त्याचा व्हिडीओ कुणीतरी व्हायरल केला आणि हा व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच जयेशच्या प्रेमात पडले. त्याच्या खणखणीत आवाजानं सबंध महाराष्ट्राला वेड लावलं. आता हाच जयेश ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटासाठी गाणार आहे. होय, हिंदी आणि मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल (Ajay Atul) यांनी नुकतंच जयेशकडून एक गाणं रेकॉर्ड करून घेतलं.
अजय-अतुल यांनी नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेश खरेला मोठी संधी दिली. जयेश खरे हा शिर्डीजवळील राहुरीपासून 30 किमीवर असलेल्या एका गावात राहणारा अत्यंत गरीब घरातील मुलगा. त्याचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये कि-बोर्ड वाजवतात. वर्षातील केवळ सहा महिनेच त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळते. मग उर्वरित दिवस शेतमजुरी करून ते घर चालवतात शिवाय जयेशच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. एक दिवस जयेशने शाळेत ‘चंद्रा’ हे गाणं गायलं आणि त्याच्या आवाजातील या गाण्यानं त्याला स्टार केलं. त्याने शाळेच्या गणवेशात गायलेलं हे गाणं सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. त्याच्या गाण्याचा व्हिडीओ अजय-अतुल यांच्या नजरेत पडला आणि अजय-अतुल यांनी मनोमन याच्याकडूनच शाहिरांच्या लहानपणीचं गाणं गाऊन घ्यायचंही ठरवलं. यानंतर त्यांनी जयेशचा शोध घेतला गेला. त्याला मुंबईला बोलावून अजय-अतुल यांनी दोन दिवस तालीम केली आणि त्याच्या आवाजातील गाणं गाऊन घेतलं.
केदार शिंदे यांची पोस्ट‘महाराष्ट्र शाहीर’चे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी याबद्दल पोस्ट केली आहे. ‘अस्सल मातीतला कलाकार व्हायरल व्हिडीओने सापडतो आणि थेट अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो.... महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं... इतिहास असाच लिहिला जातो... महाराष्ट्र शाहीर....28 एप्रिल 2023...’, अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.केदार शिंदे यांच्या या पोस्टनंतर सगळेच जयेशचं कौतुक करत आहेत. शिवाय त्याला संधी देणाऱ्या अजय-अतुल यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होतोय.