अनेक कलाकारांना त्यांच्या उतारवयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काहींना तर शेवटच्या क्षणी राहायला घर नसते. तसेच त्यांना साधे खायला देखील मिळत नाही. अशा कलाकारांच्या अनेक कथा आपण आजवर ऐकल्या आहेत. पण या कलाकारांसाठी काही करावे असा विचार अद्याप तरी कोणी केला नव्हता. पण अभिनेत्री विशाखा सुभेदारने या कलावंतांचा विचार करून त्यांच्यासाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
तिनेच याबाबत मेसेजद्वारे तिच्या जवळच्या व्यक्तींना कळवले आहे. तिने मेसेजमध्ये लिहिले आहे की, काही वयोवृद्ध कलाकार वाईट अवस्थेत दिसले. तेव्हापासून गेली काही वर्ष एक विचार डोक्यात घोळत होता. आपण बऱ्याचदा कामामध्ये व्यग्र असल्याने नातेवाईकांशी संबंध ठेवायला आपल्याला वेळ मिळत नाही. कुटुंबातील केवळ पोरंबाळं, बायको वगळता तसा जवळचा संबंध कोणाशी ठेवला जात नाही. चित्रीकरण करत असताना शुटिंगचे युनिट आपलं कुटुंब होतं..! एकदा वय व्हायला लागलं की, आधाराला पटकन कोणी उभं राहात नाही. त्यामुळे आपणच आपला आधार व्हावं असं मनात आलं... अनेक वृद्धाश्रम असूनही कलाकारांसाठी एक वेगळे वृद्धाश्रम असावं असं वाटलं... जिथे म्हातारपणी गप्पांचा, अनुभवांचा फड जमेल. आपल्याच फिल्ड मधले लोक एकत्र असले की, आठवणी-कल्पना याला उधाण येतं. काळ सुखकर होतो... एकटेपण दूर व्हावा या संकल्पनेतून एकल्या किंवा एकट्या पडलेल्या वयोवृद्ध किंवा पन्नाशी ओलांडलेल्या कलाकार मित्र मैत्रिणींसाठी एक कलाश्रय सुरू करण्याचा विचार आहे आणि ईश्वरकृपेने सांगण्यास आनंद होत आहे की, पाठपुरवठा करून आश्रमासाठी कर्जत येथे जागा मिळवली आहे. एका संस्थेने स्वामीधाम मोग्रज आनंदवाडी कर्जत येथे कलाकार वृद्धाश्रमासाठी दीड एकर जागा दिलेली आहे. त्यावर वृद्धाश्रम उभं करायचं आहे. या कामात सर्व कलाकारांनी पुढाकार घेऊया आणि आपल्या कलाकारांसाठी वेगळ असं स्वआश्रम उभं करूया...! ६ एप्रिलला याच ठिकाणी अन्नछत्राचे उद्घाटन केले जाणार आहे. तर तुम्ही एकदा या ठिकाणी येऊन नक्कीच भेट द्यावी आणि आपले मत, विचार ,संकल्पनेसाठी कल्पना सांगाव्यात ही विनंती. कृपया ही तारीख आपण लक्षात ठेवावी...!