पडद्यामागे राहून सिनेमासाठी काम करणारे तंत्रज्ञ कधीच समोर येत नाहीत. डबिंग आर्टिस्ट त्यापैकीच एक असतात. अगदी बेमालूमपणे आपलं काम करणाऱ्या या डबिंग आर्टिस्टपैकी एक आहेत सिद्धार्थ कुलकर्णी. भाषेवरील प्रभुत्व, उत्तम आवाज आणि अचूक शब्दोउच्चारांच्या बळावर सिद्धार्थने आजवर विविध भाषांसाठी व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे
बालदोस्तांच्या आवडत्या कर्टुन्सना बोलते करायचे असो, वा एखाद्या अमराठी कलाकाराला मराठीचे शब्दोउच्चार शिकवायचे असोत. अमेरिकन, ब्रिटिश, युरोपिनय, ऑस्ट्रेलियन, एशियन, आफ्रिकन आदी भाषांमध्ये डबिंग करायचे असो, वा एखाद्या सोहळ्याचे निवेदन करायचे असो. सिद्धार्थ सर्वच बाबतीत अगदी तरबेज आहे. सध्या युट्यूब चॅनलवरील कार्यक्रमांमुळेही सिद्धार्थ कुलकर्णी हे नाव चांगलेच गाजत आहे. ‘टेड-एक्स टॉक’ आणि ‘द लोर फोक’ या सिद्धार्थच्या कार्यक्रमांना रसिकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
‘फर्जंद चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारलेल्या ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याच्या यशोगाथेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यात ‘कोंडाजी फर्जंद’ ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहन या अमराठी अभिनेत्याच्या अभिनयाचे कौतुकही सर्वानीच केले. ‘फर्जंद’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत काम करणाऱ्या अंकितला डबिंग करताना मराठी वळणाच्या शब्दोच्चारांसाठी मदत मिळाली ती डबिंग आर्टिस्ट सिद्धार्थ कुलकर्णी यांची. डबिंग झाल्यानंतर अंकितचे मराठी वळणाचे काही शब्द नीट नसल्याचं लक्षात आल्यावर अंकितला योग्य असा आवाज असलेल्या सिद्धार्थने अवघ्या २ दिवसात समाधानकारकरित्या हे काम पूर्ण केले. सिद्धार्थची लाभलेली साथ अंकितसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण होती.
सिद्धार्थ कुलकर्णी हा चेहरा मराठी प्रेक्षकांच्या ओळखीचा नसला तरी ‘फर्जंद’ मुळे त्याचा आवाज प्रेक्षकांच्या नक्कीच परिचयाचा झाला आहे. त्यामुळेच आवाज हीच आपली खरी ओळख असल्याचं सिद्धार्थचं म्हणणं आहे. डबिंग आर्टिस्टच्या रूपात आजवर केलेल्या कामगिरीने आत्मविश्वास दिल्याने भविष्यातही आणखी बरीच महत्त्वपूर्ण कामं करण्याची सिद्धार्थची इच्छा आहे. कोणत्याही आव्हानासाठी तत्पर असलेला सिद्धार्थ नेहमीच कोणती ना कोणती गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत असतो.