Join us

​व्हॉट्सअॅप, मेसेंजरच्या काळात दिग्दर्शक वैभव डांगेच्या "चिठ्ठी" चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 12:05 PM

आताच्या स्मार्टफोन आणि फोरजीच्या काळात इन्सटन्ट संवाद साधता येतो. मात्र, ९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाचा उदय होत असताना ग्रामीण ...

आताच्या स्मार्टफोन आणि फोरजीच्या काळात इन्सटन्ट संवाद साधता येतो. मात्र, ९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाचा उदय होत असताना ग्रामीण भागात "चिठ्ठी" हेच संवादाचे मुख्य माध्यम होते. याच "चिठ्ठी"चा भावनिक आणि नॉस्टेल्जिक अनुभव यांचा मेळ घालत "चिठ्ठी" हा चित्रपट साकारला आहे. हा चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून वैभव डांगे या नवोदित तरुणाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वैभवचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे  मात्र, पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी आगळावेगळा विषय निवडला आहे. त्यामुळेच व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरच्या काळात "चिठ्ठी" हा चित्रपट वेगळा ठरतो. 'चिठ्ठी, पत्र हे केवळ संवादाचे माध्यम नव्हते. त्याला भावनिकतेचा पदरही होता. तो आजच्या कृत्रिम संवादात हरवला आहे. त्यामुळेच या विषयावर चित्रपट करावासा वाटला. ८०-९०च्या दशकात कॉलेजमध्ये असलेल्या, प्रेमात पडलेल्यांना चिठ्ठी हा चित्रपट नक्कीच नॉस्टेल्जिक करेल,' असे वैभवने सांगितले."चिठ्ठी" या चित्रपटाचे स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी लेखन केले आहे तर धनश्री काडगावकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या पूर्वी धनश्रीने काही चित्रपटांत आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती तुझ्यात जीव रंगला या मालिकेत झळकत आहे. "चिठ्ठी" या चित्रपटातील भूमिकेविषयी धनश्री सांगते, माझी भूमिका अत्यंत साधी, 'गर्ल नेक्स्ट डोअर' अशी आहे. प्रियकराने पाठवलेली "चिठ्ठी" तिच्यापर्यंत पोहोचतच नाही आणि काय धमाल उडते असे यातले कथानक आहे. प्रत्येक प्रेक्षकाला ते नक्की आवडेल. मलाही या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे.आता या "चिठ्ठी"चा नेमका काय घोळ झाला आहे ते १९ जानेवारीलाच उलगडेल. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनीची भूमिका धनश्री काडगांवकरने साकारली आहे.या मालिकेमुळे धनश्री काडगांवकरला चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचे आपल्याला पाहायाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत. Also Read : ​'राणा'च्या'वहिनीसाहेब' सध्या या कामात आहेत बिझी?