आजवर झी स्टुडियोजच्या अनेक चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसच नाही तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. या मांदियाळीत आता आणखी एका नावाची आणि पुरस्काराची भर पडली आहे. झी स्टुडियोजच्या आगामी 'वाळवी' या चित्रपटाने तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. आजवर झी स्टुडियोजसोबत एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ.का. सारखे वेगळ्या धाटणीचे लोकप्रिय चित्रपट देणाऱ्या परेश मोकाशी यांनी 'वाळवी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
वाळवी चित्रपटाला मिळालेल्या या यशाबद्दल बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की, " शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या चित्रपटाचं स्क्रिनिंग होणं तेथील प्रेक्षकांनाच नाही तर परीक्षकांनाही हा चित्रपट आवडणंआणि त्यांनी त्यावर पुरस्काराची मोहोर उमटवणं ही मनाला आनंद देणारी बाब आहे. या पुरस्कारामुळे आमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे.
मंगेश कुलकर्णी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, " वाळवीच्या या यशाने झी स्टुडिओजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे यश या चित्रपटाच्या पुढच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये या पुरस्कारासाठी अनेक उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय कलाकृती स्पर्धेत होत्या. या सर्वांमध्ये बाजी मारत 'वाळवी' ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवला ही अभिमानाची बाब आहे."