इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर 'बलोच' चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या चित्रपटाची कथा प्रकाश जनार्दन पवार यांच्या लेखणीतून साकार झाली आहे.
जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.
प्रवीण तरडे यांनी कारकीर्दीच्या सुरूवातीला कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचे लिखाण केले होते आणि ही मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर त्यांनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या बऱ्याच मालिकांचे लेखन केले. त्यांनी आज एक अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शेवटचे ते राधे या हिंदी चित्रपटात झळकले होते. त्यानंतर सरसेनापती हंबीरराव आणि बलोच या चित्रपटात झळकणार आहे.