सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' (Juna Furniture) हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन खेडेकर यांनी महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल एका मुलाखतीत सांगितले.
सचिन खेडेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांच्यासोबत असलेल्या मैत्रीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, मी आणि महेश ४० वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. खरंतर आता दिग्दर्शक म्हणून एकमेकांना खूप ओळखतो. मी आताही सेटवर मित्राला भेटायला म्हणून जातो. काम करतो असे वाटत नाही. तेव्हाही वाटत नव्हते आणि आजही नाही. आम्ही नाटकात काम करायचो तेव्हा आम्ही सगळ्या नाक्यावर उभे असायचो. त्यावेळी आम्हाला वाटायचं की आपण नुसते एकत्र राहिलो तरी काहीतरी होईल. तिथे आम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार करायचो.
मैत्रीचा भाग जास्त आहे नट आणि दिग्दर्शकापेक्षा...
आम्ही नाटकात काम करत होतो, मग टेलिव्हिजनमध्ये काम केले आणि सिनेमात काम केले. महेश दिग्दर्शक झाला. सिनेमा करायला लागला. तो नाटकाचा निर्माता होता. मग हळूहळू त्याचं दिग्दर्शक म्हणून नाव झालं. त्याच्याकडे नेहमीच गोष्टींचा अमर्याद भंडार होता. एकावेळेला तीन -चार गोष्टी त्याच्या डोक्यात असू शकतात. एखादा विषय त्याने हातात घेतला माणसं दिसायला लागतात. सिनेमा दिसायला लागतो. ती त्याची शक्ती आहे. त्याच्याबरोबर काम करताना त्याच्यामध्ये दिग्दर्शक नट नसतो. त्यामुळे इतके काम करू शकलो. त्यामुळे मैत्रीचा भाग जास्त आहे नट आणि दिग्दर्शकापेक्षा, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.