अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट चर्चेत आली आहे.
सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने लिहिले की, काय होतो ना आपण? कसे होतो? कुणा लेखी हाता बाहेरचे, कुणा लेखी आतल्या गाठीचे. पाठीला अपेक्षा बांधून ढकललं जोरात आणि त्यावर तरंगत काढले दिवस. जस जसा एक एक धागा सैल होत गेला आपण गटांगळ्या खाल्ल्या. कधी तू, कधी मी. पहिले हात मारायला तू शिकलीस, मला मानगुटीला धरून वर आणलंस. मग मी पाय मारले.
त्याने पुढे लिहिले की, आलो पोहत पोहत लांब त्या किनाऱ्यापासून. किनाऱ्यावर आपल्याला शोधणारी एक एक मशाल गायब होत गेली. आणि त्या काळोखात तुझ्या खरचटलेल्या हातांनी धरलेला माझा हात मला दिसला. बुडण्याची भीती तिथंच गायब झाली. तुला कधीच किनाऱ्यावर परत जायचं नव्हतं. सरकणाऱ्या जमिनीवर परत कोण जा? एकत्र तरंगू म्हणालीस. मग तुला वेगळं तळं खुणावू लागलं. आणखी खोल, आणखी टुमदार. इथे पोहणं सोपं नव्हतंच. पण तिथेही नाही. जमवलंस कसंतरी.
हातात हात नसले तरी...
आता आपली तळी वेगळी आहेत पण तरंगणं तसंच आहे. आपण एकमेकांना शिकवलेलं. हातात हात नसले तरी प्रत्येक लाटेला शांत करण्याची पद्धत तीच. जिवाच्या आकांताने हातपाय मारत असलो तरी पाण्यात पाहणारी मंडळी तीच. येईल कधीतरी धुवाधार पाऊस आणि गायब होईल मधली जमीन. तेव्हा मी हात देईन. पण किनाऱ्यावर परत नको. आपण बरे. आपलं तळं बरं!, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले.