Join us

नाटक बघायला गेली अन् अभिनेत्री बनली! मराठी, हिंदीनंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत नम्रताची एन्ट्री

By नरेश डोंगरे | Published: February 26, 2024 11:55 PM

अभिनेत्री नम्रता गायकवाडची 'लोकमत'ला सदिच्छा भेट; लवकरच येणार इंद्रधनुष्य, आरएक्स हे दोन नवे प्रोजेक्ट

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: छान एमबीए करायचे अन् चांगली नोकरी शोधून सेटल व्हायचे, असा माझा विचार होता. चित्रपटांचे आकर्षण असले तरी खुद्द आपणच अभिनेत्री बनू असा कधी विचारही केला नव्हता. मात्र, एकदा सेटवर नाटक बघायला गेले अन् आज अभिनेत्री बनले. मराठी वेबसिरीज 'रानबाजार' मध्ये दमदार अभिनय झळकवणारी अभिनेत्री नम्रता गायकवाड हिची ही 'रिल-रियल' कथा आहे.

कल्याण, मुंबई राहणारी नम्रता आज 'लोकमत'मध्ये सदिच्छा भेटीला आली होती. संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना तिने आपल्या फिल्मी करियरच्या वाटचालीचे पैलू उघड केले. ती म्हणाली, २०१० ला बीबीएची परीक्षा संपल्यानंतर सुटीच्या दिवसांत एकदा वडिलांसोबत नाटकाच्या सेटवर गेले होते तेथे दिग्दर्शक अशोक समळ यांच्याशी भेट झाली. चर्चेदरम्यान त्यांनी मला आश्चर्यकारक ऑफर दिली. तुझे रंगरूप छान आहे, तू अभिनयाच्या क्षेत्रात ये, अशी ही ऑफर होती. ध्यानीमनी नसताना मिळालेल्या या ऑफरमुळे मी काही वेळेसाठी गोंधळली. आई कलाप्रेमी, तिने बालवयातच भरतनाट्यम शिकण्यास प्रेरित केले. तिला ही ऑफर सांगताच तिने प्रोत्साहन दिले आणि मी अभिनेत्री बनली.

'ज्ञानोबा माझा' नाटक आले. वृत्तपत्रात बातमी आली. त्यामुळे चोहोबाजूने काैतुकाचा वर्षाव झाला नंतर अनेक नाटकं आली. अलका कुबल प्रॉडक्शन हाऊसची 'मंगळसूत्र' ही मालिका आली. २०११ ला 'स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे आले. दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'रानबाजार' या मराठी वेबसिरीजने खूप नाव दिले. त्यानंतर थेट मल्याळी स्टार विजयबाबूसोबत 'अयाल जिवीस्विरीपुंड' हा चित्रपट मिळाला. आता स्वप्निल जोशीसोबत 'इंद्रधनुष्य' आणि ॲमेझॉनची हिंदी वेबसिरीज 'आरएक्स' येणार आहे. या दोन्हींकडून आपल्याला चांगल्या यशाची अपेक्षा आहे, असे नम्रता म्हणाली. आपण स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही सुरू केल्याचे तिने सांगितले. आपल्या या यशस्वी वाटचालीचे श्रेय तिने आईला दिले.

नाना पाटेकर, विक्रम गोखले, रिमा लागू, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, रेणूका- किशोरी शहाणे या मराठी कलावंतांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर पकड मजबूत केली. ती अलीकडे सैल झाल्याचे नम्रताच्या लक्षात आणून दिले असता तिने हे मान्य केले. मात्र, आपण त्याच प्रयत्नात असल्याची मिश्किल टिपणीही नम्रताने जोडली.

दाक्षिणात्य चित्रपटांना जसे तिकडे यश मिळते, तुलनेत मराठी चित्रपटांना (अपवाद वगळता) तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे नम्रताने मान्य केले. मराठी प्रेक्षक अत्यंत चोखंदळ आहे, हे सांगतानाच ‘सैराट’, ‘नटरंग’ सारख्या चित्रपटानंतर मराठी चित्रपटाला 'हिट' करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात असल्याचेही ती म्हणाली.

 

टॅग्स :मराठी चित्रपटलोकमतनागपूर