Join us  

असं काय घडलं की निळू फुलेंनी नाकारला विलासरावांनी जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 7:18 PM

ही गोष्ट आहे साधारण २००३- २००४ दरम्यानची, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय विलासराव देशमुख. जाणून घ्या हा रंजक किस्सा

ज्येष्ठ अभिनेते, नटश्रेष्ठ निळू फुले (Nilu Phule) यांची. निळू फुले आज आपल्यात नसले तरी त्यांच्या नावाच दबदबा आजही मनोरंजन विश्वातून कमी झालेला नाही.  इथे जितका त्यांच्या अभिनयाचा दरारा होता तितकाच त्यांच्या सामाजिक कामाचा आणि व्यक्तिमत्वाचाही. त्यांनी २०० हून अधिक मराठी चित्रपट, १० हुन अधिक हिंदी चित्रपट आणि कित्येक नाटक आणि वगनाट्य गाजवली. पण अभिनय क्षेत्राइतकेच ते सामाजिक कामात देखील सक्रिय असायचे. मग ते अंधश्रद्धा निर्मूलन असो किंवा पाण्यासाठीचे लढे असो किंवा आदिवासींचे प्रश्न. याच त्यांच्या संपूर्ण कार्याचा गौरव म्हणून एका महाराष्ट्र शासनान त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरवले.

ही गोष्ट आहे साधारण २००३- २००४ दरम्यानची, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय विलासराव देशमुख. निळू फुले यांचे मनोरंजन क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्याचा आवाका पाहून विलासरावांकडून त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. जसं निळू फुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली आणि विलासरावांनी निळू फुलेंना कॉल केला.  विलासराव म्हणाले, शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे. आता फक्त यासाठी तुमची संमती हवी. म्हणजे आम्हाला पुरस्कार जाहीर करता येईल. 

व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे- निळू फुले

निळू फुलेंनी विलासरावांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. कदाचित इथे निळू फुलेंऐवजी एखादा दुसरा कलाकार असता तर या बातमीने हुरळून गेला असता. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला असता,  पण निळू फुले यांनी यातलं काहीही केलं नाही. उलट फुलेंनी विलासरावांना असं काही सांगितलं ज्यामुळे विलासराव चकित झालेच शिवाय हे ऐकून निळू फुलेंविषयीचा तुमच्या मनातील आदर कैक पटीने वाढेल. निळू फुले म्हणाले, ' या पुरस्कारासाठी तुम्हाला मी योग्य वाटलो त्याबद्दल तुमचे आभार. पण या पुरस्कारासाठी पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही.' 'मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे.'

निळू फुलेंचं बोलणं विलासराव ऐकतच राहिले...फोन सुरु होता, निळू भाऊ बोलत होते आणि विलास राव त्यांचा शब्द न शब्द ऐकत होते. पुढे निळू फुले म्हणाले, एक बोलू का... तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर तो डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला मोठं काम केलेले आहे. हा पुरस्कार त्यांना मिळायला हवा." निळू फुले यांचं बोलणं विलासराव ऐकतच राहिले. त्यांनी केलेली ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली आणि २००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला. या प्रसंगात निळू फुले यांच्या मनाचा मोठेपणा जितका महत्वाचा तितकाच विलासरावांचाही. कारण निळू भाऊंनी दिलेला नकारही विलासरावांनी मोठ्या मनाने स्वीकारला आणि त्यांनी दिलेला मोलाचा सल्लाही. 

टॅग्स :निळू फुले