मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे ती खूपच भारावून गेली आहे. मुळची सई सांगलीची असून एका सांगलीकराच्या कृतीमुळे तिने त्याचे आभार मानले आहेत.
सई ताम्हणकरच्या या पोस्टमध्ये काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर सईने सिने अभ्यासक अमोल मंगेश उदगीकर यांची फेसबुकवरील तिच्याशी निगडीत पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात अमोल यांनी लिहिले की, मी सांगलीला शॉर्ट फिल्म फेस्टिवलला गेलो होतो. तिथं माझ्यासोबत एक स्थानिक पोरगा होता फिरायला.त्याला मी विचारलं की ,'सांगलीमध्ये काय आहे बघण्यासारखं?'.तर तो मला एका घरासमोर घेऊन गेला आणि अभिमानाने सांगितलं , 'हे सई ताम्हणकरचं घर आहे.'मराठी सिनेमाविषयक चर्चा ऐकल्या की मला सगळ्यात आधी तो पोरगा आठवतो. सईने त्यांची ही पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.
सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. 'या गोजिरवाण्या घरात' मालिकेतून सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' या मालिकांमध्येही तिने काम केले आहे. 'सनई चौघडे' या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले.
'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स', 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.