मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). आज लक्ष्मीकांत यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, त्यांची लोकप्रियता जराही कमी झाली नाही. आजही त्यांचे जुने सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. मराठी म्हणू नका की हिंदी प्रत्येक माध्यमांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अलिकडेच दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लक्ष्मीकांतच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर त्यांची अवस्था कशी झाली होती हे सांगितलं.
मराठीतली जोडगोळी म्हणून जसं लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जायचं. तसंच महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेकडेही पाहिलं जायचं. लक्ष्या आणि महेश यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनामुळे महेश कोठारेंना जबर धक्का बसला होता.
"लक्ष्या सकाळी गेला आणि मला ३ वाजता फोन आला, रविंद्र बेर्डेचा. आणि म्हणाला, 'आपला लक्ष्या गेला रे'. तुम्ही विचार नाही करणार त्यावेळी मला काय वाटलं. जसं कळलं तसं मी, निलिमा आम्ही तडक सगळे त्याच्या घरी निघालो. तिथे पोहोचल्यावर लक्ष्या असा समोर निपचित पडला होता. मी त्याला पाहून एकच वाक्य म्हणालो What have you done lakshya, असं महेश कोठारे म्हणाले.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यात झपाटलेला, थरथराट, दे दणादण अशा कितीतरी सिनेमांचा समावेश आहे.