'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या तुफान लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता आवटे-संभेराव (namrata sambherao). सध्या नम्रता नाच गं घुमा या तिच्या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. नुकताच तिचा हा सिनेमा रिलीज झाला असून तिच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. परंतु, या सगळ्या मागचं श्रेय तिने तिच्या सासूबाईंना दिलं आहे. त्या आहेत म्हणूनच मी हे सगळं करु शकते, असं तिने जागतिक कुटुंब दिवसानिमित्त एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं.
"सध्याच्या दिवसांमध्ये 'नाच गं घुमा'चं प्रमोशन, थिएटर व्हिजिट, महाराष्ट्राची हास्यजत्रा या सगळ्यामुळे मी सतत घराबाहेर आहे. मी हे सगळं करु शकले ते माझ्या सासूबाईंमुळे. माझा मुलगा रुद्राज तीन महिन्यांचा असतांना मी पुन्हा काम करायला सुरुवात केली. तेव्हा सासूबाईंनी, आईने मला पाठिंबा दिला. तू हे करु शकतेस असा विश्वास मला दिला. मी आणि माझा नवरा योगेश कामानिमित्त बाहेर असतांना आईंनी (सासूबाईंनी) आमचं कुटुंब आणि रुद्राजला सांभाळलं", असं नम्रता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "आज रुद्राज ५ वर्षांचा आहे आणि आजीशिवाय त्याचं पान सुद्धा हलत नाही. खऱ्या अर्थाने त्यांनीच घराला घरपण दिलं आहे. कामातून जेव्हा कधी सुट्टी मिळते तेव्हा काहीतरी नियोजन केलं जातं. आता रुद्राजची उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा बेत आम्ही आखतोय."
दरम्यान, नम्रताचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते, अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे.