मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर देखील अभिनेता-दिग्दर्शक चर्चेत आहे. 'मुळशी पॅटर्न','धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटातून प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रवीण तरडेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्ट्रगल करणाऱ्यांना मी नेहमीच मदत करतो. माझ्या स्ट्रगलिंगच्या काळात मला कुणी मदत केलेले आवडायचं नाही, मी ती घ्यायची नाही. एक स्वाभिमान असतो. त्यामुळे कुणाचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून मी न विचारता मदत करतो. परस्पर मदत करतो, असे तरडेंनी सांगितले.
या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडेंनी त्यांच्या गाडीसंदर्भात एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, 'मी खूप वर्ष पैसे जमा करून पहिली टू व्हीलर घेतली होती. ती मी स्ट्रगल करणाऱ्या एका कलाकाराला दिली. दुसरी टू व्हीलर देखील मोठी गाडी घेतल्यानंतर आणखी एका स्ट्रगलरला दिली. असे मी माझी जुनी गाडी मुद्दाम कधीच विकत नाही. कारण मला जे नशीब त्या गाडीने दिले आहे ते त्या कलाकाराला मिळावे अशी माझी इच्छा असते.' या कलाकारांच्या प्रवीण तरडे संपर्कात राहतात, असाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ते भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. नवीन आलेल्या कलाकारांना ते नेहमी फोन करतात, त्याची राहण्याच्या व्यवस्थेविषयी विचारतात. 'आपण जे भोगलंय त्याबाबतची मदत नवीन पोराला व्हायला हवी' असं प्रवीण तरडे सांगतात.