ज्यावेळी विलासराव देशमुख यांची ओळख 'मुख्यमंत्री'ऐवजी 'रितेश देशमुखचे वडिल' अशी करुन देण्यात आली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 5:40 AM
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचे वडिल तसंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यात एक वेगळे नातं होतं. बाप-लेकाच्या ...
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचे वडिल तसंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यात एक वेगळे नातं होतं. बाप-लेकाच्या नात्यापेक्षा दोघांमध्ये मैत्रीचं नातं अधिक होतं. वेळोवेळी विलासराव देशमुख रितेशसाठी एक आधारस्तंभ म्हणून उभे ठाकले. रितेशच्या बॉलिवूड करियरमध्येही विलासरावांचा मोलाचा वाटा आहे. अनेकदा रितेशने याचा वारंवार उल्लेख केला आहे. विलासराव देशमुख यांचं महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणात वेगळं स्थान होतं. सगळ्यांना आपलेसे आणि सगळ्यांशी आपुलकीने बोलणारे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे आजही रितेश देशमुख म्हटलं की विलासराव देशमुख यांचा मुलगा अशी ओळख रितेशची करुन दिली जाते. आपल्या वडिलांच्या नावाने आपण ओळखलो जातो याचा रितेशला अभिमान आहे. मात्र एकदा असा प्रसंग घडला की ज्यावेळी विलासरावांची ओळख अभिनेता रितेशचे बाबा अशी करुन देण्यात आली. खुद्द रितेशने एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला आहे. नागपूरमध्ये 2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी विलासरावांची लोकप्रियता पाहता मुख्यमंत्री ही ओळख कुणीही करुन दिली असती. मात्र त्यावेळी त्या सभेला उपस्थित पहिल्या रांगेतील काही तरुण विलासरावांकडे पाहून ते बघा रितेशचे वडील असे बोलल्याचं विलासरावांनी ऐकलं. हे शब्द ऐकून त्यावेळी खुद्द विलासरावही भारावले होते. कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी असताना कुणीतरी त्यांची ओळख रितेशचे वडिल अशी करुन दिली होती. त्यावेळी विलासरावांना आनंद झाला होता असंही रितेशने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. विलासरावांच्या निधनानंतर एक दिवसही असा जात नाही की त्यांची आठवण येत नाही असंही तो म्हणाला. उलट आठवण त्यांची येते ज्यांना विसरलं जातं असं सांगायलाही तो विसरला नाही.Also Read: मराठी सेलिब्रिटींचे हे फाफे प्रकरण काय आहे?'बालक पालक', 'यलो', 'लयभारी' अशा सिनेमांनंतर रितेश आता पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'फास्टर फेणे' या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा शाळेतले आणि कॉलेजचे दिवस आठवताहेत आणि सिनेमाला येणा-या प्रत्येकाला मित्रांबरोबरची आपली धमाल नक्की आठवेल असंही रितेशने सांगितले आहे. भा. रा. भागवत यांच्या कथेतली ही पात्र पिढ्यान पिढ्या लोकप्रिय आहेत. मात्र नव्या ढंगातला आणि आजच्या पिढीचा हा फास्टर फेणे तरुणाईला विशेष भावेल, असं मतही रितेशने व्यक्त केलंय.