आपल्या देशात महापुरूष, नेते, दिग्गज व्यक्तीमत्व, सेलिब्रिटी यांची नावं रस्ते, पूल, स्थानकं यांना देण्याची पद्धत आहे. मात्र अशीच पद्धत लंडनमध्ये आहे का? परदेशातही अशीच नावं दिली जातात का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. याची तुम्हाला उत्तरंही कदाचित माहिती असतील. मात्र अभिनेता प्रसाद ओक यानं शेअर केला फोटो तुमचं कुतूहल नक्कीच वाढवेल. प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. लंडनच्या ओक रोडचा हा फोटो आहे.
या फोटोसह ‘लंडनमध्ये सुद्धा आमच्या नावाचा रोड आहे भावड्या’ अशी पोस्ट शेअर केली आहे. आता हा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल खरंच प्रसाद ओकच्या नावाचा रस्ता लंडनमध्ये आहे की काय? मात्र प्रसाद ओकचं नाव आणि या मार्गाचा काहीही संबंध नाही. लंडनमध्ये 'ओक रोड' नावाचा हा एक प्रसिद्ध मार्ग आहे. मात्र प्रसादच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर अनेक लाइक्स आणि कमेंट्सही येत आहेत.
तसेच प्रसाद ओक 'ओक ठोक' या एकपात्री कार्यक्रमातून अनोख्या अंदाजात आपल्याला पाहायला भेटीला आला आहे. ओक ठोक हा स्टॅण्ड अप कॉमेडी शो असून 27 सप्टेंबरला या एकपात्री नाटकाचा शुभारंभ अबुधाबीमध्ये पार पडला. खुद्द प्रसाद ओकने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो असलेला पोस्टर पोस्ट करून लिहिले की, 'एक नवाकोरा करकरीत एकपात्री कार्यक्रम 'ओक ठोक' हसत खेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणारा स्टॅण्ड अप विथ स्टॅण्डर्ड, आता रोख ठोक नाही 'ओक ठोक' बोलायचं...!!! शुभारंभाचा प्रयोग 27 सप्टेंबर. महाराष्ट्र मंडळ 'अबू धाबी'. या पोस्टनंतर प्रसाद ओकवर या कार्यक्रमासाठी शुभेच्छांचे अनेक मेसेज ही पाहायला मिळाले.' मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रसाद ओकने नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच त्याने 'कच्चा लिंबू' चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.