झी टॉकीज वाहिनीवर सध्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा सीझन सुरू आहे. दादा कोंडके यांची ९१ वी जयंती मंगळवार ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिली स्टार चित्रपट प्रेक्षकांना पाहता येत आहेत. येत्या रविवारी २० ऑगस्टला ‘राम राम गंगाराम ’ हा चित्रपट दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वर पहायला मिळणार आहे.
दादा कोंडके हे मराठी प्रेक्षकांचे जसे लाडके होते तसे ते बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्याही आवडीचे होते. दादांमधील कल्पकता, सिनेमाचं तंत्र, चित्रपटासाठी कष्ट घेण्याची तयारी हे नेहमीच हिंदी सिनेमातील कलाकारांनाही खुणावत होतं. दादा यांची निर्मिती असलेल्या ‘आगे की सोच’ या सिनेमात अभिनय केलेल्या अभिनेते सतीश शहा यांनाही दादांचा सहवास लाभला आहे. दादांच्या ९१व्या जयंती निमित्त झी टॉकीजवर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांना सतीश शहा यांनी शुभेच्छा तर दिल्या आहेतच पण दादांसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे.
दादा खऱ्या आयुष्यातही मायाळू होते
सतीश शहा म्हणाले “दादा कोंडके यांच्या रूपातील साधाभोळा नायक जितका प्रामाणिक आणि संवेदनशील होता तितकेच दादा खऱ्या आयुष्यातही मायाळू होते. दादांच्या इंगळी गावातील शेताच्या परिसरात जी बैलजोडी दादांनी सांभाळली ती इतकी खास आहे की जर दादांनी त्या बैलजोडीला त्यांच्यासोबत आणले नसते तर ते बैल आज या जगातच नसते. दादांचं हे प्राणीप्रेम मी जवळून पाहिलं आणि त्यानंतर मी त्यांच्या अधिकच प्रेमात पडलो”
दादांमधील माणुसकीला सलाम सतीश शहा यांनी दादांमधील माणुसकीला सलाम केला. सतीश शहा सांगतात, “दादा जेव्हा ‘आगे की सोच’ या सिनेमाची तयारी करत होते तेव्हा मला त्यांच्याकडून या सिनेमातील भूमिकेची ऑफर आली. दादांच्या सिनेमात काम करायला मिळणार याचा आनंद खूप होता. पुण्याजवळील त्यांच्या इंगळी या गावातील फार्महाउस परिसरात शूटिंग झालं. दादांची एक गोष्ट मला फार आवडायची. ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर पोटच्या मुलासारखं प्रेम करायचे. शेतातील घर, तेथील वस्तू, परिसर त्यांनी इतका छान ठेवला होता की बस्स. आम्ही ‘आगे की सोच’ या सिनेमाचं शूटिंग करत होतो तेव्हा गावातील एक शेतकरी काही अडचणीमुळे त्याच्या बैलजोडीला कत्तलखान्यात घेउन चालला होता. दादांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी ती बैलजोडी आपल्या ताब्यात घेतली. शेतातील घरी आणली आणि म्हणाले, ‘आता ही बैलजोडी इथेच राहिल. मी त्यांचा सांभाळ करेन.’ मरणाच्या वाटेवरून बैलजोडीला जीवनदान देणाऱ्या दादांनी आयुष्यभर ती बैलजोडी जपली. दादांच्या अनेक चित्रपटात ती बैलजोडी दिसते. या बैलजोडीसाठी दादा काही प्रसंग तयार करायचे आणि ते चित्रपटात दाखवायचे. दादांनी कधीच त्यांच्या या दातृत्वाचा ढोल वाजवला नाही. दादांच्या स्वभावातील ती भावलेली गोष्ट मी कधीच विसरणार नाही.”
सहा सिनेमांची मेजवानी
ज्युबिली स्टार दादा कोंडके यांचा सिनेमा एकदा का थिएटरला लागला की तो किमान २५ आठवडे गर्दी खेचायचा. त्यामुळेच दादांना ज्युबिली स्टार म्हणतात. इरसाल विनोद, रांगडा नायक, गावरान नायिका, अस्सल मातीतली कथा, भन्नाट संवाद आणि ठेक्यातली गाणी हा दादा कोंडके यांच्या सिनेमाचा फॉर्म्युला हिट झाला. यापैकी सहा सिनेमांची मेजवानी दादांच्या चाहत्यांना मिळणार आहे.