आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). गेल्या कित्येक वर्षांपासून अलका कुबल मराठी सिनेइंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. विशेष म्हणजे माहेरची साडी या सिनेमातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. आदर्श, सोशिक सून अशी त्यांची प्रेक्षकांमध्ये इमेज तयार झाली. माहेरची साडी हा सिनेमा गाजल्यानंतर त्यांच्याकडे अनेक हिंदी, मराठी सिनेमांच्या ऑफर्स आल्या. मात्र, त्यांनी अनेक दर्जेदार हिंदी सिनेमे नाकारले. या मागचं कारण, त्यांनी एका मुलाखतीत दिलं आहे.
१९९१ मध्ये 'माहेरची साडी' हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा सिनेमा इतका लोकप्रिय झाला की अलका कुबल यांच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या. अलका यांनी या सिनेमानंतर अनेक मराठी चित्रपट केले. मात्र, त्यांनी बॉलिवूडमधून ऑफर येत असतानाही त्या नाकारल्या. या मागचं कारण त्यांनी ललिता ताम्हणे यांना सांगितलं. ललिता ताम्हणे यांच्या चंदेरी सोनेरी या पुस्तकात याविषयीचा उल्लेखही आहे.
अलका कुबल यांनी 'या' कारणामुळे दिला हिंदी सिनेमांना नकार
''माहेरची साडी' या सिनेमानंतर मला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. पण, मी ठामपणे त्या सगळ्यांना नकार दिला. फक्त धार या हिंदी सिनेमामध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. यात एका पत्रकार मुलीची भूमिका वठवली होती. ही भूमिका सिनेमाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. या सिनेमाचा दिग्दर्शक माझ्या एका सह कलाकाराच्या ओळखीचा होता. त्यामुळे नाइलाजास्तोवर मला तो करावा लागला होता", असं अलका कुबल म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "कोणत्याही सिनेमाची निवड करताना मी त्याची लांबी पाहात नाही. तर, माझी भूमिका किती महत्त्वाची आहे ते पाहते. पण, हिंदी चित्रपटांसाठी वाट्टेल तसे ड्रेस घालण्याची किंवा शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती. तसंच हिंदी सिनेमांमध्ये छोट्या भूमिका करण्यापेक्षा मराठी सिनेमात नायिका म्हणून मध्यवर्ती भूमिका करणं केव्हाही चांगलं नाही?" दरम्यान, अलका कुबल यांनी नया जहर या हिंदी सिनेमातही काम केलं होतं. मात्र, हा सिनेमा फारसा चालला नाही.