दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची होणारी चाळण यामुळे मुंबईकर मेताकुटीला आला आहे. कोणीच त्या रस्त्यांच्या दुरस्तीकडे लक्ष देत नाही. अशाच खड्डयांत गेलेल्या रस्त्यांवर रोज मुंबईकरांना प्रवास करावा लागतो. हाच प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणाही ठरतोय. या रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून ''खड्ड्यांत गेली मुंबई'' हे आपसुकच आपल्या तोंडून नाही निघाले तरच नवल.
गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांची होणारी बिकट अवस्था आणि यांमुळे वाहतूक कोंडीची ही समस्या पाहायला मिळते. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा या रस्त्यांची दुरावस्थेमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत तासनतास खोळंबतात. मात्र पर्याय नसल्याने कोंडी सुटेपर्यंत त्यांना ताटकळत राहावं लागतं. यावर सेलिब्रेटी मंडळीही आपले मत मांडत विविध प्रश्नांना वाचा फोडताना पाहायला मिळतायेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह आता अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेही आपल्या बेजाबदार प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. मुंबईत चांगले रस्ते आपल्या वाट्याला येत नाही.
मात्र मुख्यमंत्र्यांचा बंगला (वर्षा) आणि मंत्रालया च्या समोरील रस्ते बरे गुळगुळीत आहेत. काही दिवसांपूर्वी पुष्कर श्रोत्रीला ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या प्रयोगासाठी थेट विलेपार्ले ते डोंबिवली असा प्रवास करायचा होता. रस्त्यांची झालेल्या बिकट अवस्थेमुळे तब्बल सव्वा तीन तास इतका वेळ त्याला प्रवास करावा लागला. असा काहीसा अनुभव अनिकेत विश्वासरावलाही आला. रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे त्यालाही वाहतूक कोंडीत ताटकळत राहावं लागलं होते.