मकरंद अनासपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. मकरंद यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. मकरंद अनासपुरे यांचे सिनेमे म्हणजे मनोरंजनाची खात्री. मकरंद यांचा आगामी सिनेमा 'राजकारण गेलं मिशीत' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. यानिमित्ताने मकरंद अनासपुरे सध्या विविध माध्यमांत मुलाखती देत आहेत. अशातच मकरंद अनासपुरे राजकारणात जाणार का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय.
रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत कोणत्या पार्टीकडून तिकीट मिळालं तर राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता मकरद स्पष्टच म्हणाले, "कलावंत म्हणून प्रसिद्धी मिळाल्यावर चला आता आपण राजकारणात जाऊ याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. आमचा तेवढा अभ्यास आहे का? राजकारणात जाणं म्हणजे हॉटेल मध्ये जाण्यासारख नाही! चला आज मस्तानी खाऊया हॉटेलमध्ये. हे सोप्प नसतं."
मकरंद पुढे सांगतात, "आमच्या क्षेत्रात येताना लोकं म्हणतात सर मला पण अभिनय करायचा आहे? तर मी त्याला विचारतो तू काय शिकला आहेस त्या क्षेत्रात.. तो म्हणतो काही नाही! कधीतरी शाळेत एकदा नाटकात काम केलं होतं. तर मी त्याला म्हणतो तुला पंखा दुरुस्त करता येतो का? तो म्हणतो नाही. मी म्हणतो का?. तर तो म्हणतो मला त्यातलं काही माहीत नाही. मी म्हटलं तसंच असतं प्रत्येक क्षेत्राच. तुम्हाला तेव्हढा अभ्यास केल्याने त्या क्षेत्रात जाण्याची मुभा नाही. आम्ही उत्तम बोलू शकतो म्हणून आम्ही संसदेत जाऊन भरपूर भाषणं केली पण कार्य कुशलतेच काय? मुळात राजकारण म्हणून समजून घेण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, जो आवाका लागतो तो तुमच्याकडे असला पाहिजे तर तुम्ही राजकारणात जाऊ शकता." मकरंद यांचा आगामी सिनेमा 'राजकारण गेलं मिशीत' १९ एपिलला भेटीला येतोय.