Join us

'अशोक मामांच्या सहभागानं आम्हाला...', रितेश देशमुखनं सांगितला 'वेड' सिनेमादरम्यान आलेला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 11:17 AM

Ved Movie : 'वेड' चित्रपटात रितेश देशमुखच्या वडिलांची भूमिका अशोक सराफ यांनी साकारली आहे.

रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) दिग्दर्शित 'वेड' (Ved Marathi Movie) चित्रपटाने अक्षरशः लोकांना वेड लावलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुख (Genelia D'souza-Deshmukh) हिने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचेही सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुखनेअशोक सराफ यांच्यासोबतचा अनुभव शेअर केला आहे. 

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अशोक सराफ यांच्यासोबत एकदा तरी काम करता यावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आता रितेश देशमुखचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. वेड चित्रपटात त्याच्या वडिलांची भूमिका अशोक सराफ यांनी साकारली आहे.रितेश देशमुख म्हणाला की, काही लोकांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला आश्वासक वाटतं…धीर येतो. ‘अशोक सराफ’ हे तसंच नाव.

तो पुढे म्हणाला की, अशोक मामा, तुम्ही आज पंचाहत्तरीची तरुणाई गाठली. #वेड चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न केला. आणि पहिला प्रयत्न असूनही तुम्ही आशिर्वादासारखे माझ्या पाठिशी उभे राहिलात. तुमच्या सहभागाने आम्हाला केवळ धीर नाही आला तर चित्रपटालाच धार आली आहे.मामा तुम्हाला आरोग्य, दीर्घाआयु आणि समाधान लाभो हीच निसर्गाकडे प्रार्थना. #ashoksaraf #happybirthday

‘वेड’ चित्रपटाने एका आठवड्याच्या आतच कमाईचा एकूण १५ कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात रितेश-जिनिलिया आणि अशोक सराफ यांच्याशिवाय शुभंकर तावडे, जिया शंकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळाला.

टॅग्स :रितेश देशमुखअशोक सराफजेनेलिया डिसूजा