गडकरींचा पुतळा बसविल्याशिवाय पुण्यात प्रयोग करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2017 11:53 AM
राजसंन्यास या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचे सांगत, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा पुण्यातील ...
राजसंन्यास या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचे सांगत, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा पुण्यातील संभाजी उद्यानामधील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला आणि मुठा नदीपात्रामध्ये फेकून दिला. मंगळवारी भल्या पहाटे ही गोष्ट वाºयासारखी पसल्यानंतर, सर्वच क्षेत्रातून तीव्र निषेध करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी गाजविलेला अभिनेता पुष्कर श्रोत्रीने देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सोशलसाईट्सवर पुष्करने याविषयी आपल्या भावना परखडपणे व्यक्त केल्या आहेत. पुष्कर सांगतोय, मी जात, पात, धर्म, पंथ मानत नाही... मला एकच कळतं की मी कलाकार म्हणून जन्माला आलोय, आणि माज्या कलेचा अपमान मी खपवून घेणार नाही! राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून काय साधताय? मी ह्या घटनेला निषेध करतो आणि जोपर्यन्त राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाहीत, तोपर्यंत मी पुण्यात प्रयोग करणार नाही! असे पुष्करने सांगितले आहे. संभाजी उद्यानामध्ये २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते पुतळा बसवण्यात आला होता. चौथºयावर गडकरींच्या एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास आणि राजसंन्यास या नाटकांची नावे कोरलेला ताम्रपट आहे. राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी उदयानात सन्मानाने बसविल्यानंतरच आता पुष्करचे पुण्यानगरीत प्रयोग होणार हे मात्र निश्चित झाले आहे. तर नाट्य परिषदेच्या सर्व सभासदांनी दुपारी दीडच्या सुमारास संभाजी उद्यानात एकत्र जमून या घटनेचा निषेध केला. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी देखील या घटनेचा निषेध करून पुतळा पुन्हा उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.