Join us

…. तर स्त्रियांचा लढा अधिक दमदार बनेल - सौरभ आपटे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 11:41 AM

‘माझा एल्गार’ या मराठी चित्रपटाद्वारे संघर्षाची एक अनोखी गाथा रुपेरी पडद्यावर सादर झाली आहे. एक यशस्वी उद्योजक असलेल्या सौरभ ...

‘माझा एल्गार’ या मराठी चित्रपटाद्वारे संघर्षाची एक अनोखी गाथा रुपेरी पडद्यावर सादर झाली आहे. एक यशस्वी उद्योजक असलेल्या सौरभ आपटे यांनी पहिल्याच प्रयत्नात मनोरंजन आणि प्रबोधन यांचा अचूक ताळमेळ साधत ‘माझा एल्गार’ची निर्मिती केली असून हा चित्रपट संकटांचा धीरोदात्तपणे सामना करण्याचा संदेश देणारा असल्याचं ते मानतात.श्री सद्गुरू फिल्म्स प्रोडक्शन या बॅनर अंतर्गत सौरभ आपटे यांनी ‘माझा एल्गार’ची निर्मिती केली आहे. श्रीकांत आपटे यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद कांबळे यांनी केलं आहे. सिनेविश्वाची आवड असलेल्या सौरभ यांना मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याची इच्छा होती. त्यासाठी ते एखाद्या सशक्त कथानकाच्या प्रतिक्षेत होते.मिलिंद कांबळे यांनी ‘माझा एल्गार’ची कथा ऐकवली आणि आपला शोध संपल्याचं मानत सौरभ म्हणाले की,‘चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. मनोरंजन हे या व्यवसायाचं मुलभूत अंग असलं तरी त्यासोबत एक सामाजिक संदेश देण्याचा विचार चित्रपटांच्या माध्यमातून व्हायला हवा असं नेहमीच वाटायचं. याच कारणामुळे ‘माझा एल्गार’ हा चित्रपट बनवला’. सौरभ यांना यात त्यांच्या वडिलांची, म्हणजे श्रीकांत आपटे यांची ही चांगली साथ लाभली.इतर चित्रपटांच्या तुलनेत स्त्रीप्रधान चित्रपटांची संख्या कमी असल्याने याच कथानकाद्वारे निर्मितीत उतरण्याचा निश्चय केला. आजही स्त्रियांवर अन्याय होत आहेत. अन्यायापुढे न झुकता त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. यासाठी स्त्रियांनी स्वत: ‘स्ट्राँग’ होण्याची गरज आहे. दिग्दर्शक मिलिंद कांबळे तसेच कलाकारांच्या मुख्य जोडीचा हा पहिलाच चित्रपट असला तरी प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे केल्याने एक परिपूर्ण कलाकृती सादर करीत असल्याचं समाधान लाभत आहे. ऐश्वर्या राजेश आणि यश कदम यांचा मुख्य भूमिकेतला हा पहिलाच चित्रपट असून दोघांनीही अप्रतिम अभिनय केला आहे.याला स्वप्नील राजशेखर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याची साथ लाभल्याने अनुभवी आणि नवोदितांचा उत्तम ताळमेळ असलेली टिम तयार झाली. यातूनच उत्तम सिनेमा बनला. संघर्षमय कथानकाला सुरेल गीतांचा साज चढवण्यात आला आहे. या जोडीला तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट अधिक सक्षम व्हावा याकडेही लक्ष देण्यात आलं आहे. स्त्रियांच्या संघर्षाला जर पुरुषांचा भक्कम पाठिंबा लाभला तर त्यांचा लढा कसा अधिक दमदार बनतो हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने ‘माझा एल्गार’ हा चित्रपट पाहायला हवा. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच ‘माझा एल्गार’ची कथा लिहीली आहे. चेतन किंजळकर यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर आदि कलाकारांनीही या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. जितेंद्र जैस्वार यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडली आहे.