Join us

एकेकाळी अभिनयाऐवजी लक्ष्मीकांत बेर्डे करत होते हे काम, फार कमी लोकांना आहे याबद्दल माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 7:00 AM

लक्ष्मीकांत बेर्डे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी ते लॉटरीची तिकिटे विकत होते. त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला रत्नागिरीमध्ये झाला. लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या ५ भावंडांपैकी एक. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहानपणी लॉटरीची तिकिटे सुद्धा विकली होती. याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

 मराठी साहित्य संघमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना लक्ष्मीकांत यांनी मराठी रंगमंचावरील नाटकांमध्ये काम साकारण्यास सुरुवात केली. लक्ष्मीकांत यांनी आपल्या लेक चालली सासरला या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले.

१९८३-८४ मध्ये टूर टूर या मराठी नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर, ते आणि अभिनेता महेश कोठारे यांनी धूम धडाका (१९८४) आणि दे दना दन (१९८५) या चित्रपटात एकत्र काम केले. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले यात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदीशैली सर्वांना दाखवून दिली. ज्यामुळे ते एका रात्रीत लोकप्रिय झाले.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिग्दर्शक-अभिनेता महेश कोठारे, अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. या जोडीचे चित्रपट आजही प्रेक्षक वारंवार पाहताना दिसतात. 

१९८९ साली सलमान खानबरोबर मैने प्यार किया या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डेंनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. हम आपके हैं कौन, मेरे सपनो की राणी, आरझू, साजन, बेटा आणि अनारी हे त्यांचे हिंदी चित्रपट हिट ठरले.  सर्वांना खळखळून हसविणार्‍या या विनोदाच्या बादशाहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानामुळे आजही ते रसिकांच्या स्मरणात कायम आहेत.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे