अबोली कुलकर्णी
‘संगीत म्हणजे श्वास, संगीत म्हणजे ध्यास.. माझं संपूर्ण आयुष्यच संगीताने व्यापून टाकले आहे. संगीताशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही,’ असे मत ‘नाळ’ या मराठी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अद्वैत नेमलेकर यांनी मांडले. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही हितगुज...
* ‘नाळ’ या मराठी चित्रपटासाठी तुम्ही संगीत दिग्दर्शन केले आहे. संगीताला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. काय सांगाल?- बरं वाटलं ऐकून. या चित्रपटाच्या गाण्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळेल, असे मला वाटले नव्हते. २-३ महिन्यांपूर्वी जेव्हा झी म्युझिक ने संगीत टेकओव्हर केलं. त्यानंतर ते सगळीकडेच हिट झाले. प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. कामाचं चीज झालं असं वाटत आहे.
* तुम्हाला जेव्हा या चित्रपटाची आॅफर आली तेव्हा तुमची रिअॅक्शन काय होती?- मला खरंतर माहित नव्हतं की, नागराज मंजुळे हे या चित्रपटाशी संबंधित असणार आहेत. पण, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी मला चित्रपट आवडतो का बघ? असे विचारले तर तेवढ्यात नागराज मंजुळे तिथे आले आणि त्यांना जेव्हा मी पाहिले तेव्हा मला जाणवलं की, सैराटची टीम यासोबत असणार आहे. मग मी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायचे ठरवले. आता प्रेक्षकांच्याही अपेक्षा आणि जबाबदाºया देखील वाढल्या आहेत. त्यामुळे दडपण तर असणारच.
* तुम्ही गुजराती सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शनाचे काम केले आहे. मग मराठीकडे कसे वळलात?- खरंतर मी ३ वर्षांचा असताना पासून माझ्या संगीत शिक्षणाला सुरूवात झाली. ‘लंडन स्कूल आॅफ म्युजिक’ मध्ये मी संगीत शिक्षण घेतले. मी १७ वर्षांचा असताना माझा मित्र एक शॉर्टफिल्म बनवत होता. ‘भन्साळींच्या व्हिसलिंग वुड्स’ या संस्थेसाठीच्या पहिल्या शॉर्टफिल्मसाठी मी संगीत दिले. त्याचवर्षी मला ८ शॉर्टफिल्म्सची आॅफर आली. आत्तापर्यंत मी १५० शॉर्टफिल्मला संगीत दिले आहे.
* चित्रपटांबरोबरच तुम्ही टीव्ही मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शनाचे काम केले आहे. कोणता फरक जाणवतो चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये?- टीव्ही मालिकांसाठी संगीत दिग्दर्शन करत असताना त्यांना वेळच नसतो. आम्ही चित्रपट वा मालिका यांच्यासाठी काम करत असताना अगोदर थीम तयार करतो. त्यानंतर मग आम्ही ते बनवतो. फरक फारसा काहीही नाही. आपापल्या ठिकाणी दोघांचीही मजा काही निराळीच आहे.
* तुम्हाला संगीतातील ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला आहे. कसं वाटतंय?- होय, मला जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा ती खूपच अचानक मिळाली. तेव्हा मी सुट्टीवर होतो. प्रवासात मला माझ्या मित्राचा फोन आला की, तुला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. तेव्हा मी त्याला म्हणालो की, तू गंमत क रू नकोस. तर तो म्हणाला की,‘खरंच तुला हा पुरस्कार मिळाला आहे.’ तेव्हा कुठे विश्वास बसला आणि मी तेव्हा प्रचंड आनंदात होतो.’