झी टॉकीज या मराठी वाहिनीवर, गेली अनेक वर्षे दर्जेदार मराठी चित्रपटांची रेलचेल असते. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळेच आज ही वाहिनी सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांची पहिली पसंती असलेल्या या वाहिनीवर, एखाद्या चित्रपटाचा प्रीमियर कधी होणार याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. येत्या रविवारी, २८ एप्रिल रोजी 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' सर्वांच्या लाडक्या 'झी टॉकीज' या वाहिनीवर होणार आहे. २०१८च्या नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेला हा चित्रपट, येत्या रविवारी घरी बसून पाहता येईल. दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट 'झी टॉकीज'वर प्रदर्शित होईल. अभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाददेखील लिहिले आहेत. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन तिथे उभ्या राहिलेल्या आयटी कंपन्या, त्याचे गावातील कुटुंबांवर झालेले परिणाम यावर हा चित्रपट आधारित आहे. आयुष्य उध्वस्त झालेली गावातील मंडळी या सगळ्या गोष्टींवर कशाप्रकारे प्रतिसाद देतात याभोवती सिनेमाचे कथानक फिरते.
१९२०च्या दशकात सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली, धरणग्रस्तांसाठी मुळशी सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहात पुढे क्रांतिकारी घटनांची भर पडली. 'मुळशी पॅटर्न' हा शब्द या सत्याग्रहाच्या लढ्यातून प्रेरित होऊन अस्तित्वात आला आहे. मुळशीमधील शेतकऱ्यांसाठी सेनापती बापट यांनी जसा लढा दिला, तसाच लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ही गोष्ट एका तालुक्याची असली, तरी देशातील अनेक गावांची सध्याची परिस्थिती दाखवणारी आहे. चांगला अभिनय, उत्तम कथानक आणि योग्य दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षणीय ठरतो. वाढत्या औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम या चित्रपटात फार उत्तमरीत्या दाखवण्यात आले आहेत. गावातील मंडळींची, शेतकऱ्यांची सध्या होत असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहायला हवा. एक कलाकृती म्हणून सुद्धा चित्रपट छान जमून आला आहे.